देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
राहुरीत तहसीलदारांच्या बनावट सह्या, शिक्के वापरून ताबा पावत्या करण्याचा खळबळजनक प्रकार राहुरीमध्ये घडला असून याप्रकरणी राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत, राहुरीचे तहसीलदार नामदेव रामचंद्र पाटील, वय – ४७ यांनीपोलिसात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, अरूण नामदेव चव्हाण, रा. वळण, ता. राहुरी यांनी कार्यालयात येवून कार्यालयाकडून देण्यात आलेल्या दोन ताबा पावत्या दाखवल्या. मात्र,त्याची तपासणी केली असता दोन्ही ताबा पावत्या या तहसील कार्यालयाकडून निर्गमीत केल्या गेल्या नसल्याचे शहानिशा केल्यावर दिसून आले.
तसेच कोणत्याही वाहनाचा ताबा देण्याची कार्यवाही ३ मे २०२४ रोजी या कार्यालयाकडून करण्यात आलेली नव्हती. वाहन लिलावात सदर ताबा पावत्यांमध्ये वर्णन केलेल्या कोणत्याही वाहनाचा समावेश नव्हता.त्यामुळे सदर इसमाने तहसीलदार, राहुरी यांची बनावट पद्धतीने सही करून बनावट गोल शिक्का वापरून फायद्याच्या आमीषाने कागदपत्रे तयार करून तहसील कार्यालयाच्या नावाचा वापर करून फसवणुकीच्या उद्देशाने बनावट कागदपत्रे तयार करून ती खरे असल्याचे भासवल्याची तक्रार तहसीलदार पाटील यांनी दिली असून एका अनोळखी इसमाविरूद्ध राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास राहुरी पोलीस करीत आहेत.