मायणी : सातारा जिल्ह्यात पक्षी संवर्धनासाठी राखीव केलेल्या मायणी पक्षी संवर्धनाबाबत तयार करण्यात येणाऱ्या आराखड्यास अंतिम स्वरुप देण्यासाठी पुण्याच्या रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट ॲण्ड वाइल्डलाइफ या संस्थेमार्फत पाहणी करण्यात आली.
त्यास मायणीतील ग्रामस्थ, वन विभाग, संयुक्त व्यवस्थापन समितीने सकारात्मक सहभाग नोंदवून निधीच्या तरतुदीची मागणी केली.
वन विभाग व ग्रामस्थांच्या मदतीने हा आराखडा करण्याचे काम सुरु आहे. रेस्क्यू टीमचे नचिकेत उत्पात, आकाश राऊत, वन विभागाच्या सहाय्यक वनसंरक्षक रेश्मा व्होरकाटे, खटाव तालुका वनक्षेत्रपाल नितीन आटपाडकर, मायणीचे वनपाल महादेव पाटील,
वनरक्षक पुंडलिक मुंडे, संतोष गलांडे, संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा व सरपंच सोनाली माने, उपसरपंच दादासाहेब कचरे, सदस्या रुपाली जाधव, सदस्य अंकुश चव्हाण, युवराज भिसे, हेमंत जाधव, निसर्गप्रेमी तानाजी लिपारे, फ्रेंडस् ग्रुपचे महेश जाधव, विशाल चव्हाण आदी उपस्थित होते.
रेस्क्यू टीमने मायणी तलावाची पाहणी करीत स्थानिक ग्रामस्थ, पर्यावरणप्रेमींची बैठक घेतली. तानाजी लिपारे म्हणाले, वनक्षेत्रातील निर्जीव झाडे वन विभागाने काढून टाकावीत. त्याठिकाणी नवीन स्थानिक वृक्षांची लागण करावी.
दादासाहेब कचरे म्हणाले, पक्ष्यांचा अधिवास कायम करण्यासाठी तलावात पाणथळीच्या जागा निर्माण कराव्या लागतील. त्यासाठी पाटबंधारे विभागाची मदत घ्यावी लागेल. हेमंत जाधव म्हणाले, मायणीचा परदेशी पक्ष्यांचा इतिहास मोठा आहे.
त्यासाठी मायणीकर ग्रामस्थ वन विभागाला सहकार्य करतील. गावातील सामाजिक संस्था नेहमीच वन विभागाच्या मदतीला धावून येतात. संवर्धनाच्या विकासासाठी ग्रामस्थांचे पूर्ण सहकार्य राहिल, असे महेश जाधव यांनी सांगितले. अंकुश चव्हाण यांनी पक्षीसंवर्धनात आढणारे परदेशी पक्षी, फुलपाखरे, वन्यप्राण्यांचा अधिवास याची माहिती रेस्क्यू टिमला दिली. मायणी पक्षी संवर्धनात कोणकोणत्या भौतिक सुधारणा करण्याची गरजेच्या आहेत याचीही माहिती त्यांनी घेतली.