मेढा : जावळी तालुक्यातील दुर्गम, डोंगराळ भागात दळणवळण सुकर करण्यासाठी नेहमीच पाठपुरावा करणारे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नांमुळे एसटीच्या मेढा आगारासाठी नवीन आठ बसेस उपलब्ध झाल्या आहेत. या बसेसचे लोकार्पण आणि फेर्यांचा शुभारंभ लवकरच केला जाणार आहे. मेढा आणि सातारा आगारांमधील अनेक बसगाड्या जुन्या, जीर्ण झाल्याने आणि गाड्यांची संख्या पुरेशी नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे मेढा व सातारा आगारांना नवीन एसटी बसेस देण्याची आग्रही मागणी ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राज्याच्या परिवहन विभागाकडे केली होती. या मागणीनुसार मेढा आगारासाठी नवीन आठ बसगाड्या मंजूर झाल्या असून, त्या आगारात दाखल होणार आहेत.
सद्य स्थितीत सातारा आगारात 107 बसगाड्या (इलेक्ट्रिक बसगाड्या धरून), तर मेढा आगाराकडे 43 बसगाड्या आहेत. प्रवाशांची गैरसोय दूर होण्यासाठी सातारा आगाराला 13 आणि मेढा आगाराला नवीन 24 गाड्या मिळाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्याने पहिल्या टप्प्यात मेढा आगारासाठी नवीन आठ गाड्या उपलब्ध झाल्या आहेत. मेढ्यासाठी आणखी 16 आणि सातारा डेपोसाठी 13 नवीन बसेस उपलब्ध करून देण्यासाठी ना. शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा सुरु आहे.
मेढा आगाराला मिळालेल्या नवीन गाड्यांपैकी दोन बसेस मेढा ते कुर्ला-नेहरूनगर, प्रत्येकी एक बस मेढा ते मुंबई, मेढा ते बार्शी, आणि प्रत्येकी बसेस मेढा ते नाशिक आणि मेढा ते परळी- वैजनाथ या मार्गावर धावणार आहेत. या नवीन बसेसमुळे जावळी तालुक्यातील आणि बाहेरून जावळी तालुक्यात येणार्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या नवीन बसेस उपलब्ध झाल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.