सातारा/अनिल वीर : “मोठ्या बँकेची छोटी गोष्ट” हे पुस्तक म्हणजे सर्वसामान्य माणसांमध्ये बँकिंग क्षेत्राबद्दल उत्सुकता निर्माण करणारे पुस्तक आहे.असे प्रतिपादन कादंबरीकार बाळासाहेब लबडे यांनी केले. येथील दीपलक्ष्मी पतसंस्था आयोजित, “मोठ्या बँकेची छोटी गोष्ट” लेखक – विनोद कुलकर्णी यांनी लिहिलेल्या पुस्तकावरील चर्चेप्रसंगी लबडे बोलत होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ.राजेंद्र माने,म.सा.प.पुणेचे कार्यवाह शिरीष चिटणीस, श्रीकांत कात्रे,बँकिंग तज्ञ ॲड. सीमा नुलकर, सीईओ जनता बँकेचे अनिल जठार आदी मान्यवर उपस्थित होते.
बाळासाहेब लबडे म्हणाले,”या पुस्तकामध्ये बँकिंग क्षेत्रात काम करताना लेखकाला आलेल्या स्व:अनुभवाचे कथन केले आहे. तसेच बँकिंग क्षेत्रातील सर्व घटकाला स्पर्श केला आहे. पुस्तकातील भूमिका सर्वस्पर्शी, व्यापक,उदारमतवादी व सर्वकल्याणकारी आहे.मराठी साहित्यामध्ये आत्तापर्यंत जी पुस्तके लिहिली गेली त्यामध्ये सर्वात वेगळ्या वाटेने जाणारे तसेच पुस्तकाचे शीर्षक हे कॅचि असून सर्वसामान्य माणसांमध्ये उत्सुकता निर्माण करणारे आहे. सर्वसामान्य माणसांमध्ये रुजणारे हे पुस्तक आहे. सध्याच्या काळात माणसांना इतर गोष्टी वाचण्यापेक्षा पैशा पाण्याची गोष्ट ही एका मारवाडीची गोष्ट यासारख्या अर्थकारणावरची पुस्तके वाचायला आवडतात.
लोकांना समोर जो चेहरा दिसतो तो जाणून न घेता जो चेहरा दिसत नाही. तो जाणून घेण्याची इच्छा असते. एखादी बँक बुडाली तर एवढी चर्चा होत नाही. पण तीच एखादी बँक बुडालेल्या अवस्थेतून वर आली तर वर येण्यासाठी कोणते मार्ग अवलंबले याची चर्चा होते. हे पुस्तक म्हणजे बेस्ट आहे.लोकल आहे ते पुस्तक ग्लोबल व्हावे. तसेच या पुस्तकाचा हिंदी व इंग्रजी मध्ये अनुवाद व्हावा.हे पुस्तक म्हणजे प्रांजळता, निरागसता, प्रामाणिकपणा,सहजता तसेच दुसऱ्याला निखळ दृष्टी दाखवणारे पुस्तक आहे.”
यावेळी शिरीष चिटणीस, विनोद कुलकर्णी, डॉ.राजेंद्र माने, ॲड.सीमंतिनी नूलकर, श्रीकांत कात्रे व अनिल जठार यांनीही सविस्तर असे पुस्तकांवर भाष्य केले.विनायक भोसले यांनी सूत्रसंचालन व आग्नेश शिंदे यांनी आभारप्रदर्शन केले.