सातारा/अनिल वीर : विद्यार्थ्यांना जर यश मिळवायचे असेल तर त्यांनी नेहमीच उच्च ध्येय मनामध्ये बाळगून त्यानुसार आपली वाटचाल केली पाहिजे. जीवनामधील यशासाठी खडतर प्रयत्नांचीही गरज आहे. असे प्रतिपादन स्प्रिंग कॉम्प्युटिंग टेक्नोलॉजी पुणेचे सीईओ मोहन चौबळ यांनी केले.
येथील लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेच्या लोकमंगल प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, एमआयडीसी कोडोली येथे आयोजित रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेज यांच्यावतीने मोहन चौबळ व सोनाली चौबळ यांच्या स्प्रिंग कॉम्प्युटिंग टेक्नोलॉजी यांच्यातर्फे प्राथमिकच्या वर्गासाठी 50 बेंच देणगी रूपाने विद्यालयास दिल्याबद्दल व लोकमंगल प्राथमिक विद्यामंदिरच्या विद्यार्थिनी सिद्धी मनोहर सावंत यांची पीएसआयपदी निवड झाल्याबद्दल जाहीर सत्कार करण्यात आला.तेव्हा चौबळ बोलत होते.यावेळी सोनाली चौबळ, लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस, संचालिका शिल्पा चिटणीस, सतीश पवार, मुख्याध्यापिका ज्योती नलवडे, विजय यादव, गुलाब पठाण,सिद्धीच्या आई शिल्पा मनोहर सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
मोहन चौबळ म्हणाले, “या शाळेत यायला मला नेहमीच आनंद वाटतो. या शाळेतील शिक्षक नेहमीच तळमळीने काम करत असतात. रोटरी क्लब च्या माध्यमातून आम्ही बऱ्याच शाळासाठी काम करत असतो. शाळांमध्ये वेगवेगळ्या सुविधा निर्माण करण्यासाठी, शाळांचे वर्ग बांधून देण्यासाठी, बेंचेस देण्यासाठी, वॉशरूमसाठी आम्ही नेहमी काम करत असतो. त्यानिमित्ताने माझे बऱ्याच शाळांमध्ये जाणे होते. परंतु या शाळेमधील शिक्षकांमध्ये जो उत्साह मला जाणवतो तो मला इतर कुठेही दिसला नाही. येथील शिक्षक अतिशय मनापासून काम करतात. विविध आंतरशालेय स्पर्धामध्ये मुलांनी भाग घ्यावा. यासाठी शिक्षकांचे कायमच प्रयत्न सुरू असतात. नाट्य स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, संगीत स्पर्धा सर्व ठिकाणी मुलांना घेऊन जाण्याचे व त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम शिक्षक करत असतात. स्पर्धामध्ये बक्षीस मिळतात किंवा नाही हे महत्त्वाचे नसून विद्यार्थ्यांना मिळणारा अनुभव महत्त्वाचा असतो. माझे काका चंद्रकांत चौबळ हे साताऱ्यातल्या पोलीस दलामध्ये डीवायएसपी म्हणून होते. त्यामुळे पोलिसाबद्दल मला विशेष आदर आहे. सिद्धीचे मी विशेष अभिनंदन करतो. मुलांनी वेगवेगळ्या विषयावर वाचत राहणे हे खूप महत्वाचे आहे. या संस्थेला मदत म्हणून आजपर्यंत रोटरीने यामागेही मदत केलेली आहेच.यापुढेही करत राहील. तसेच स्प्रिंग कम्प्यूटिंग टेक्नोलॉजीच्या माध्यमातूनही मदात करत राहू.”
शिरीष चिटणीस म्हणाले, “सिद्धी सावंत या मध्यमवर्ग कुटुंबामधील मुलगी असून ती आपल्या शाळेमध्ये असताना तिचे वर्गशिक्षक संदीप जाधव व इतरांनी तिला नेहमीच शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. मुलांना क्लास लावावे लागतात. परंतु तुम्हाला मात्र क्लास लावावे लागत नाहीत. तुमचे शिक्षक हेच तुमचे आई-वडील आहेत. तुमचे शिक्षक हेच तुमचे गुरु आहेत. आपली शाळा तुमचे विविध गुण हेरून ते गुण विकसित करण्याचा प्रयत्न करते. ज्या शाळेमध्ये चांगले शिक्षक आहेत.जसे ते आपल्या शाळेमध्ये आहेत.ज्या शाळेमध्ये मैत्रिणींना मैत्रिणीबरोबर जायला मिळते. विद्यार्थ्यांना विद्यार्थ्याबरोबर जायला मिळते.ज्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना गुरुजनाबद्दल आदर आहे.ती मंडळी करिअरमध्ये जास्त पुढे जातात. सिद्धी सावंतचा सत्कार विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा आहे. वाचन करण्याची प्रेरणा मिळावी. त्यामधूनच तुम्ही शाळेच्या लायब्ररीचा वाचनासाठी पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे.”
सोनाली चौबळ म्हणाल्या, “चिटणीससाहेबांची विद्यार्थ्याविषयीची तळमळ आजपर्यंत मी पाहिलेली आहे. सिद्धीची मुलाखत मी माझ्या मुलींना सांगणार आहे. माझ्या दोन मुली त्यापैकी एक इंजिनिअरिंगला आहे दुसरी मुलगी आठवीला आहे.त्या दोन्ही मुलींना मी सिद्धी सावंत हिने पीएसआय बनताना कशाप्रकारे स्ट्रगल केले ? याविषयी मी माझ्या मुलींना नक्कीच सांगणार आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनी सिद्धीचे मनोगत ऐकून त्यापासून प्रेरणा घ्यावी.”
संदीप जाधाव म्हणाले,” सिद्धी सावंत हिने अतिशय कष्टातून पीएसआय हे पद मिळवलेले आहे. तिने कोणताही क्लास न लावता स्वतः अभ्यास करून यश मिळवलेले आहे.”
सत्कारास उत्तर देताना सिद्धी सावंत म्हणाल्या, “ज्या शाळेत मी शिकले त्या शाळेने आज माझा सत्कार केला आहे. याबद्दल मला आज खूप छान वाटते आहे. मी चौथीला स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसल्यामुळे माझा एक प्रकारे आत्मविश्वास वाढला होता. एमपीएससी परीक्षेचा पाया तिथेच घातला गेला असे मला वाटते. शाळेमध्ये खूप ऍक्टिव्हिटी होत होत्या. अभ्यासाबरोबर आम्ही खेळ सुद्धा खेळायचो. माझा पाया छान प्रकारे रचला गेला. माझ्या आईने मला या शाळेत शिकण्याचा आग्रह केला. मला छान शिक्षक लाभले. शिक्षकामुळे व माझ्या आई-वडिलांमुळे माझ्यावर छान संस्कार झाले. त्यामुळे मी पीएसआय पदावर पोहोचू शकले. नववी दहावी मध्येच मुलांनी आपले ध्येय निश्चित केले पाहिजे. आयुष्यामध्ये काय बनायचे आहे ? यासाठी ध्येय फिक्स केले पाहिजे. सोशल मीडियाचा वापर करा .परंतु इंस्टाग्रामचा वापर टाळा. ज्याचा काही उपयोग होत नाही. त्याचा वापर करू नका. युट्युबवर आजकाल सगळे उपलब्ध आहेत. बारावीला असतानाच मी पोलीस होण्याचा निश्चय केला होता. वडिलांचा मला चांगला सपोर्ट होता. जीवाचे रान करून 14 तास मी अभ्यास केला. महाराष्ट्रमधून मुलींच्या मधून आठव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले.” यावेळी शिल्पा सावंत, ज्योती नलवडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सदरच्या कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिरीष चिटणीस यांनी केले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर मोहटकर यांनी केले. आभार हणमंत खुडे यांनी मानले.