सन २०२४च्या निवडणुकांसाठी सर्वानी एकत्रीत येणे गरजेचे आहे : संभाजी भगत

0
21

सातारा/अनिल वीर : भारतीय संविधानाने दिलेल्या मूलभूत स्वातंत्र्य, समतेच्या,न्यायाच्या,माणुसकीच्या  हक्कासाठी लढण्याची आवश्यकता आहे.कलावंताची परिस्थिती अद्याप नाजूक असली तरी तोच खऱ्या अर्थाने समाजप्रबोधन करीत असतो. शिवाय,संविधान नाचे खऱ्या अर्थाने संरक्षण करायचे असेल तरच सन २०२४ च्या निवडणुकात सर्व बहुजनांनी एक होणे गरजेचे आहे.असे आवाहन लोकशाहीर संभाजी भगत यांनी केले. 

 येथील संबोधी प्रतिष्ठानच्यावतीने कॅप्टन साहेबराव बनसोडे यांच्या ९३ व्या जयंतीदिनी १४ वा सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार लोककलावंत धम्मरक्षित श्रीरंग रणदिवे यांना शाहीर संभाजी भगत यांच्या हस्ते नगर वाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संबोधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनकर झिंब्रे होते. 

   शाहीर संभाजी भगत म्हणाले , “पुरस्कार हे तोंड बंद/उघडण्यासाठी दिले जातात. जुन्याबरोबरच नवीन कलावंतांची फरफट होत आहे. तरीसुद्धा मोठ्या धैर्याने प्रबोधनाचा गाढा हाकत आहेत. संविधानामुळे भय दूर झालेले आहे. संबोधी प्रतिष्ठानचा उपक्रम हा सत्याच्या बाजूने उभे राहण्यासाठी व बोलण्यासाठी बळ देणारा आहे.भारतीय संविधान जनतेच्या जीवनात अमुलाग्र बदल घडविणारा  मोलाचा दस्तावेज आहे. हे संविधान दिल्लीच्या जंतर-मंतर येथे उघडपणे जाळले जाते ही बाब भयंकर आहे.भाषण करणाऱ्या लेखक, विचारवंत आणि शाहीर यांना वाईट दिवस आले आहेत. अशा आणीबाणीच्या काळात पुढील पिढीच्या भवितव्यासाठी निर्भयपणे लढण्याची गरज आहे.”

              सत्काराला उत्तर देताना धम्मरक्षित रणदिवे म्हणाले, “देशभक्तीने भारावल्यानेचआपण  समतेचा जागर करण्यासाठी कलाक्षेत्राला वाहून घेतले आहे. माणूस जोडण्याची व बहुजन हिताची चळवळ कलेच्या माध्यमातून जोर लावून लढण्याचे आपले ध्येय आहे.”

                 शाहीर संभाजी भगत व धम्मरक्षित रणदिवे यांनी याप्रसंगी आपल्या भारदस्त आवाजातील गीतांची झलक दाखवून श्रोत्यांना भारावून टाकले. धम्मरक्षित यांचे सर्व कुटुंब,कॅप्टन बनसोडे सर्व परिवार,जयंत उथळे, शाहीर भगत यांचे शिष्य विशाल पारदे, संबोधी प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष केशवराव कदम, विश्वस्त कार्यकर्ते यांच्यासह, सातारवासीय,विविध क्षेत्रातील मान्यवर, श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उषा महिपत भोसले यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. रमेश इंजे यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य संजय कांबळे व हौसेराव धुमाळ यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ.प्रा.सौ.सुवर्णा यादव यांनी सूत्रसंचालन केले.यशपाल बनसोडे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here