दिर्घायुष्य जीवनासाठी विषमुक्त शेती व पालेभाज्याचा जास्तीत जास्त वापर करा : प्रा.डॉ. दयावती पाडळकर

0

         

कडेगांव दि.16(प्रतिनिधी) – मानवाचे आयुर्मान हे मानवाच्या आहारावर अवलंबून आहे. आज रासायनिक शेतीमुळे मानवाचे आर्यमान कमी झाले असून आपणास जर चांगले व दिर्घायुष्य जीवन जगायचे असेल तर विषमुक्त शेती करुन पालेभाज्याचा जास्तीत जास्त वापर आपल्या आहारात केला पाहिजे असे प्रतिपादन कन्या महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. दयावती पाडळकर यांनी केले. 

         ‌      ते आर्टस् ॲड कॉमर्स कॉलेज, कडेपूर येथे बोलत होत्या.  आर्टस् ॲड कॉमर्स कॉलेज, कडेपूर व मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालय, कडेगांव यांच्या सामंजस्य करारा अंतर्गत समाजशास्त्र विभागाच्या वतीने ‘मानवी जीवन व आरोग्य’  या विषयावर प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. बापूराव पवार हे होते. यावेळी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे  समन्वयक प्रा.दत्तात्रय थोरबोले, प्रा.डॉ.आशा सावंत प्रमुख उपस्थित होते. प्रारंभी समाजशात्र विभागप्रमुख प्रा.सौ. संगीता पाटील यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश सांगितला.

                या विश्वामध्ये आपले अस्तित्व सिध्द करणासाठीच आपणास मानवी जन्म मिळाला आहे हे प्रत्येकांनी लक्षात ठेवले पाहिजे असे सांगून प्रा.डॉ.दयावती पाडळकर पुढे म्हणाल्या की, तुमचे आरोग्य चांगले असेल तरच तुम्ही स्वतः चे अस्तित्व निर्माण करू शकता. उत्तम आरोग्य राहण्यासाठी उत्तम आहाराची आवश्यकता असून प्रत्येकानी पालेभाज्या व कडधान्याचा जास्तीत-जास्त वापर करुन दररोज व्यायाम करावा. आपले वैयक्तिक आरोग्य चांगले असेल तरच समाजाचे आरोग्य चांगले राहिल आणि सामाजिक आरोग्य चांगले असेल तरच राष्ट्र सामर्थ्यवान बनेल म्हणून प्रत्येक व्यक्तिने धावपळीच्या जीवनामध्ये स्वतः च्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे असेही त्या शेवटी म्हणाल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. अरुणा कांबळे यांनी तर शेवटी आभारप्रदर्शन प्रा. डॉ. नामदेव पाटील यांनी केले. यावेळी विद्यार्थी व प्राध्यापक वृंद मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here