शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी प्रदेश काँग्रेस कार्यालयात वरिष्ठ नेत्यांकडून आढावा शिर्डी : शिवसेनेकडे स्वतःचा उमेदवार नाही त्यामुळे आयात उमेदवारासाठी शिर्डी मतदारसंघ काँग्रेसने कदापिही सोडू नये अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मुंबई येथे व्यक्त केली. शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी आढावा प्रदेश काँग्रेस कार्यालयात वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत आढावा घेण्यात आला. शिर्डी लोकसभेची जागा काँग्रेसनेच लढवली पाहिजे.पक्षाच्या टिळक भवन येथील प्रदेश कार्यालयात लोकसभेची आढावा बैठक पार पडली. यावेळी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री अमित देशमुख, सतेज उर्फ बंटी पाटील, कार्याध्यक्ष आ. प्रणिती शिंदे, महिला प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे, माजी मंत्री नसीम खान आदींसह प्रमुख नेते उपस्थित होते. काँग्रेस नेत्यांसमोर तशी नितीन शिंदे यांनी आग्रही मागणी केली आहे.
शिर्डी मतदारसंघाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी शिर्डी मतदारसंघ हा काँग्रेसचाच आहे. ठाकरे सेनेचे निवडून आलेले खासदार शिंदे सेनेत गेले आहेत. त्यामुळे सेनेकडे स्थानिक सक्षम उमेदवार नाही. उत्तरेत सहापैकी पाच आमदार हे महाविकास आघाडीचे आहेत. काँग्रेसने ही जागा लढवलीच पाहिजे. शिवसेनेकडे स्थानिक उमेदवार नसल्यामुळे आयात उमेदवारासाठी हा मतदारसंघ काँग्रेसने कदापिही सोडू नये, अशी आग्रही मागणी यावेळी नितीन शिंदे, विजय जाधव, चंद्रकांत बागुल, चंद्रहार जगताप यांच्या सह कार्यकर्त्यांनी केली.
