जामखेड तालुक्यात घरफोड्या करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

0

जामखेड तालुका प्रतिनिधी

जामखेड तालुक्यामध्ये विविध ठिकाणी घरफोडी करणारी टोळी गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आली आहे. पोलिसांनी चार आरोपींसह दोन लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. आरोपीकडून सहा घरफोडीचे गुन्हे उघड झाले आहेत.

काकासाहेब रामदास अडाले (रा.धोत्री, ता.जामखेड)हे ३ डिसेंबर २०२४ ला कुटुंबियासह लग्नाकरीता बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरटयांनी त्यांचे घराचे दरवाजाचा कडीकोंडा तोडून घरातील सोन्याचे दागीने व रोख रक्कम चोरून नेले होते. याबाबत जामखेड पोलीस स्टेशन ला अडाले यांच्या तक्रारी वरून घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जामखेड पोलीस स्टेशन हद्दीत सातत्याने घरफोडीचे गुन्हे होत असल्याने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना घरफोडीच्या गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकीस आणणे बाबत आदेशित केले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात व पोलीस अंमलदार बबन मखरे, हृदय घोडके, फुरकान शेख, संतोष खैरे, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, मेघराज कोल्हे, ज्योती शिंदे, सारिका दरेकर व उमाकांत गावडे अशांचे पथक नेमुन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत आवश्यक सूचना देवुन पथकास रवाना केले.

तपास पथक वरील गुन्हयांतील गेला माल व आरोपीचा तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे जामखेड पोलीस स्टेशन हद्दीत शोध घेत असताना गुप्त बातमीदारमार्फत माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा निंबाळकर आसाराम भोसले (रा.आष्टी, जि.बीड याने त्याचे साथीदारासह केलेला असून ते चोरी केलेले सोने विक्री करण्यासाठी गुगळे प्लॉटींग, जामखेड येथे येणार आहेत. पथकाने मिळालेल्या बातमीतील ठिकाणी जाऊन संशयितांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले.

ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव निंबाळकर आसाराम भोसले ( वय ३६ रा.रूटी, ता.आष्टी, जि.बीड), आहिलाश्या उर्फ जाधव उर्फ झोळया जंगल्या भोसले (वय ५०, रा.पांडेगव्हाण, ता.आष्टी, जि.बीड) कौशल्या अहिलाश्या भोसले (वय ३५,रा.पांडेगव्हाण, ता.आष्टी, जि.बीड ) आणि महादेव सुखदेव भोसले (वय ५५, रा.चिखली, ता.आष्टी, जि.बीड) असे सांगितले. आरोपींची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता आरोपी महादेव सुखदेव जाधव त्याचे ताब्यातुन ७०,०००/- रू किं. १०ग्रॅम सोन्याचे नेकलेस, १५,०००/- रू किं मोबाईल, आरोपी निंबाळकर आसाराम भोसले याचे ताब्यातुन ७०,०००/- रू किं.१० ग्रॅम सोन्याचे बाजीगर व आरोपी आहिलाश्या जंगल्या भोसले याचे ताब्यातुन ७५,०००/- रू किं. अर्धवट नंबर असलेली एक मोटार सायकल असा एकुण २,३०,०००/- रू किं मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

तपास पथकाने आरोपींची विश्वासात घेऊन गुन्हयांबाबत विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा हा रामेश्वर जंगल्या भोसले, (रा.पांडेगव्हाण, ता.आष्टी, जि.बीड) याचे मदतीने केला असल्याची माहिती सांगीतली. तसेच गुन्हयातील चोरलेले सोने हे कौशल्या अहिलाश्या भोसले हिचे मदतीने महादेव सुखदेव जाधव यास विकण्यासाठी आलो होतो, अशी माहिती दिली. ताब्यात घेण्यात आलेले आरोपी व त्यांचा साथीदार रामेश्वर जंगल्या भोसले यांच्यासह जामखेड, कर्जत व खर्डा येथे घरफोडीचे गुन्हे केले असल्याचे दिलेल्या माहितीवरून, जामखेड, कर्जत व खर्डा पोलीस स्टेशनचे अभिलेखावरील घरफोडीचे सहागुन्हे उघडकिस आणले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here