मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर उर्फ सुलोचना दीदी यांचं निधन झालं आहे. त्या 94 वर्षांच्या होत्या. चित्रपटातली आई म्हणून त्या ओळखल्या जात असत.सुलोचना दीदी म्हणून त्या सगळीकडे ओळखल्या जात. त्यांचा जन्म 30 जुलै 1928 ला झाला. भालजी पेंढारकर यांनी दिग्दर्शित केलेल्या अनेक चित्रपटांत त्यांनी काम केलं आहे. मराठी बरोबर हिंदी चित्रपटांतही त्यांनी अनेक भूमिका केल्या. 1943 साली हिंदी चित्रपटसृष्टीत पृथ्वीराज कपूर यांच्याबरोबर सहकलाकार म्हणून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर राजकपूर शम्मी कपूर, शशी कपूर या दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीबरोबरही त्यांनी काम केलं.
‘वहिनीच्या बांगड्या,’ ‘मीठ भाकर’ ‘मराठा तितुका मेळावा’ साधी माणसं, कटी पतंग हे त्यांचे हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतले गाजलेले चित्रपट आहेत.
मराठी चित्रपटसृष्टीतील मौलिक योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. प्रपंच चित्रपटासाठी राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार (1963), संत गोरा कुंभार या चित्रपटासाठी विशेष अभिनेत्रीचा पुरस्कार (1968), महाराष्ट्र शासनाचा ‘व्ही. शांताराम पुरस्कार’ (1997), केंद्र शासनातर्फे ‘पद्मश्री’ (1999), अ. भा. मराठी चित्रपट महामंडळातर्फे ‘चित्रभूषण’ पुरस्कार (2003), महाराष्ट्र शासनातर्फे ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ (2010) पुरस्कारांचा त्यात समावेश आहे.
सोमवारी संध्याकाळी साडेपाच वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याचं त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं.