कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदार संघात निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पिक विमा भरपाई मिळावी यासाठी आ. आशुतोष काळे यांनी दोनच दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ यांची भेट घेवून कोपरगाव मतदार संघात दुष्काळाची पाहणी करावी अशी मागणी केली होती. त्या मागणीची जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेतल्यामुळे बुधवार (दि.२३) पासून कोपरगाव मतदार संघात दुष्काळाची पाहणी सुरु झाली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
चालू वर्षी खरीप हंगामात कोपरगाव विधानसभा मतदार संघात शेतकऱ्यांनी बाजरी, मका, कापूस, तूर, सोयाबीन, भुईमुग आदी पिकांच्या पेरण्या केल्या मात्र मागील २५ दिवसांपासून कोपरगाव मतदार संघाकडे पावसाने पूर्णत: पाठ फिरविल्यामुळे खरीपाची पिके जळून चालली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. जनावरांचा चारा व पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून जात असून संपूर्ण मतदार संघात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर झालेल्या नुकसानीची पाहणी करावी व शेतकऱ्यांना लवकरात लवकर विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळावी यासाठी आ. आशुतोष काळे यांनी दोनच दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ यांची भेट घेवून कोपरगाव मतदार संघात दुष्काळ जाहीर करण्यासाठी तातडीने पाहणी सुरू करण्याची मागणी केली होती. त्या मागणीनुसार कोपरगाव मतदार संघात पावसाने उघडीप दिल्यामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची प्रशासनाकडून पाहणी केली जाणार आहे. या पाहणी दरम्यान सर्व शेतकऱ्यांनी झालेल्या पिकांचे नुकसान पाहणी करणाऱ्या पथकाच्या निदर्शनास आणून द्यावेत असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.