येसगावच्या विकासाची वाटचाल कायम सुरू राहील -स्नेहलताताई कोल्हे

0

येसगाव ग्रामपंचायतच्या वतीने स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ

कोपरगाव : राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त येसगाव हे विकासाच्या बाबतीत कोपरगाव तालुक्यातील एक आदर्श गाव असून, येसगाव ग्रामपंचायतच्या वतीने गावातील लोकांना मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्याबरोबरच शासनाकडून मिळणाऱ्या निधीतून अनेक विकासकामे करण्यात आली आहेत. माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते विकासाची कामे करत आहेत. यापुढील काळातही येसगावच्या विकासाची वाटचाल अशीच कायम सुरू राहील, असे सांगून, यासाठी ग्रामपंचायतला कोल्हे परिवार व संजीवनी उद्योग समुहाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांनी दिली. 

कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथे ग्रामपंचायतच्या वतीने गुरुवारी (२४ ऑगस्ट) अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचा विकास करणे योजनेअंतर्गत बग्गी रोड (दत्त मंदिर) वर पथदिवे बसवणे (१० लाख रुपये), गावठाण रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसवणे (१० लाख रुपये), गोरखनगरमध्ये गटार बांधणे (९ लाख रुपये), गोरखनगरमधील रस्ता कॉंक्रिटीकरण करणे (६ लाख रुपये), येसगाव येथील शिंगणापूर वस्ती रस्ता डांबरीकरण करणे (१२ लाख रुपये), पाईक वस्ती रस्ता डांबरीकरण करणे (१६ लाख रुपये), गावठाण अंतर्गत रस्ता कॉँक्रिटीकरण करणे (१५ लाख रुपये) अशा विविध विकासकामांचा शुभारंभ स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला. यावेळी स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते दिव्यांग कल्याण निधीतून जवळपास ३८ ते ४० लाभार्थ्यांना किराणा किटचे वाटप, समाजकल्याण विभागाच्या निधीतून अनुसूचित जाती-जमातीच्या नागरिकांना एलईडी बल्बचे वितरण तसेच अंगणवाडी केंद्रामार्फत गरोदर माता आणि लहान बाळांचे वजन करण्यासाठी वजनकाट्याचे वितरणदेखील करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here