आ.आशुतोष काळेंच्या प्रचार फेरीला कोपरगाव शहरात नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद
कोळपेवाडी वार्ताहर :- जनतेला विकासाची जी काही आश्वासने दिली त्यापैकी बहुतांश आश्वासने पूर्ण झाली असून उर्वरित कामे पूर्णत्वाच्या मार्गावर असून पुढील काळात पूर्ण होणार आहेत. त्यामुळे मतदार संघातील ग्रामीण भागात मतदारांचा जोरदार प्रतिसाद तर मिळतच आहे त्याचबरोबर कोपरगाव शहरातील प्रत्येक प्रभागात होत असलेल्या कॉर्नर सभांना देखील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहे. एकूणच विकासाचे प्रश्न सुटल्यामुळे निवडणूक मतदारांनीच हातात घेतली असल्यामुळे पुढील विकासाच्या योजना आखण्यास सुरुवात केली असल्याचे सांगत आ. आशुतोष काळे यांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.
सोमवार (दि.११) रोजी आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरात प्रचार फेरी काढली यावेळी या प्रचार फेरीत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधतांना ते बोलत होते. यावेळी या प्रचार फेरीमध्ये महिलांची देखील संख्या लक्षणीय होती. सर्व कार्यकर्त्यांनी आ.आशुतोष काळे यांचे कटआउटस हातात घेवून त्यावर लिहिलेले ‘एक नंबर’, ‘आमचं ठरलंय’ हे घोषवाक्य नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. यावेळी आ.आशुतोष काळे म्हणाले की, सत्ताधारी पक्षाचा लोकप्रतिनिधी या नात्याने माझी विकासाची जबाबदारी पार पाडतांना मतदार संघातील जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केली. मतदार संघातील रस्ते, वीज, पाणी, आरोग्य हि मुलभूत प्रश्न सोडवीली आहेत. या पाच वर्षात केलेल्या विकास कामांना जनतेसमोर घेवून जात आहे आणि विकासाच्या मुद्द्यावरच निवडणुकीला सामोरे जात आहे.
कोपरगाव शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविला आहे. कोपरगाव शहरासह मतदार संघातील रस्त्यांचा प्रश्न बहुतांशी सुटला असून भविष्यात मतदार संघात सिमेंटच्या रस्त्यांचे जाळे उभारायचे आहे. उपजिल्हा रुग्णालयाचे काम प्रगतीपथावर असून त्या माध्यमातून आरोग्याचा प्रश्न सुटणार आहे. या पाच वर्षात जनतेला माझ्याकडून विकासाच्या ज्या काही अपेक्षा होत्या त्या अपेक्षा पूर्ण केल्यामुळे जनता समाधानी आहे त्यामुळे मतदारांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
तत्पूर्वी प्रचार फेरीला सुरुवात करतांना कोपरगाव शहरातील हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आदी महापुरुषांच्या स्मारकांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी रस्त्याने ठिकठिकाणी सुवासिनींनी आ.आशुतोष काळे यांचे औक्षण केले व नागरिकांनी देखील हस्तांदोलन करून त्यांना आशीर्वाद दिले.