संगमनेर : संगमनेर शहर आणि उपनगरात सध्या मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीने डोके वर काढले असून या गुन्हेगारीला तात्काळ पायबंद घालावा व गुन्हेगारांना शोधून त्यांना जेरबंद करावे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना निवेदन दिले.
मनसे पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, संगमनेर शहर आणि उपनगरात मोठ्या प्रमाणात चोऱ्या वाढल्या आहेत. त्याचबरोबर धूम स्टाईल महिलांचे दागिने लांबवले जात आहेत. संगमनेर शहर आणि बस स्थानक परिसरात दुचाकी चोरीचे प्रकार वाढले आहेत. त्याचबरोबर तालुक्याच्या ग्रामीण भागातून आलेल्या एका शेतकऱ्याच्या दुचाकी वर असणारी ५० किलो सोयाबीनची गोणी चोरट्यांनी लांबवली आहे. बस स्थानक परिसरातून वृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी पळवले आहे. त्यामुळे याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या महिलांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या प्रकाराला शहर पोलिसांनी तात्काळ आळा घालावा अशी मागणी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना दिलेल्या निवेदनातून मनसे पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष शरद गोर्डे,तालुकाध्यक्ष अशोक शिंदे,शहराध्यक्ष तुषार ठाकूर, शेतकरी सेना तालुकाध्यक्ष दिपक वर्पे, सचिव संजय शिंदे, शहर उपाध्यक्ष आकाश भोसले. आदी पदाधिकारी उपस्थित होते.