कोळपेवाडी वार्ताहर :- महाराष्ट्र हि संतांची भूमी असून या भूमीच्या उदरात अनेक संत महात्म्यांनी जन्म घेवून भक्तीचा मार्ग दाखवून जीवन जगण्यासाठी योग्य दिशा दिली. त्याप्रमाणेच संत शिरोमणी सावता महाराजांनी देखील दैनंदिन जीवनात कार्य करत असताना तन, मन एकरूप करून हाती घेवून करीत असलेले कार्य पार पाडताना कर्म हेच विठ्ठल भक्तीचं, मोक्ष प्राप्तीचं अनुरूप साधन असल्याचे सांगत समाजाला प्रपंच आणि भक्तीचा सुखकर मार्ग दिला असे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.
वाकडी येथे १५ लक्ष रूपये निधीतून संत श्री सावता माळी महाराज मंदीर परिसरात बसवण्यात आलेल्या पेव्हर ब्लॉक्सचे लोकार्पण प.पू. महंत श्री रामगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते व आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी श्री सावता महाराजांना अभिवादन करून प.पू. महंत श्री रामगिरीजी महाराज यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा लाभ घेवून त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी समाजबांधव व वाकडी ग्रामस्थमोठ्या संख्येने उपस्थित होते.
मताधिक्य कमी मात्र विकासनिधीचा आकडा कमी होवू दिला नाही –
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वाकडी गावातून अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही. मात्र मतदार संघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने सर्व गावांना समसमान विकास निधी दिला असून जरी वाकडी गावाने मला मताधिक्य कमी दिले तरी देखील वाकडी गावाचा विकास निधीचा आकडा कमी होवू दिला नाही. या साडे चार वर्षात श्री क्षेत्र खंडोबा देवस्थानसह वाकडी गावाला जवळपास ४५ कोटीचा निधी दिला आहे.-आ.आशुतोष काळे.