देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
वडील बाजार करून घराजवळ आले म्हणून वडीलांच्या गाडीकडे धावत गेलेल्या सहा वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना राहुरी तालुक्यातील ताहाराबाद येथे दि.८ रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली आहे. चक्क जखमी चिमुकल्यावर बापाच्या समोर बिबट्याने हल्ला केल्याने वडिलांनी जिवाच्या आकांताने बिबट्याच्या तावडीतून चिमुरड्याची सुटका केली. मात्र या घटनेत चिमुरडा गंभीर जखमी झाला आहे.रुद्र सचिन गागरे (वय ६ वर्षे, गागरे वस्ती, ताहाराबाद, ता. राहुरी) असे जखमी झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील ताहाराबाद येथील चिमुरडा रुद्र गागरे हा आपले वडील बाजारावरून घरी आले असता त्यांना पाहून तो त्यांच्या गाडीकडे धावत गेला. मात्र शेजारीच दबा धरून बसलेला बिबट्या चिमुरड्याच्या दिशेने धावत आला आणि चिमूरड्यावर हल्ला केला. यावेळी प्रसंगावधान राखत त्याच्या वडीलांनी बिबट्याच्या जबड्यातून रुद्रला ओढुन काढले आणि बिबट्याने तेथून धूम ठोकली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र चिमुरडा रुद्र गंभीर जखमी झाला आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार रुद्र गागरे याला अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून तेथे त्याच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. यावेळी राहुरी वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी युवराज पाचारणे यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. घटनास्थळाचा पंचनामा करून घटनास्थळी त्वरित पिंजरा लावला आहे.
————————–
■ चिमुरड्याच्या बापाचे होतेय कौतुक!
आपल्या पोटच्या लेकरावर आपल्यासमोर एखादी घटना घडतेय आणि बाप लेकरासाठी काहीच करत नाही असे कधी होत नाही. असाच एक प्रसंग ताहाराबाद येथील चिमुरड्यावर बिबट्याने हल्ला केला आणि पुढे होणाऱ्या अनर्थचा कोणताही विचार न करता चक्क बापाने आपल्या चिमूरड्याला बिबट्याच्या जबड्यातून ओढून काढून त्याचा जीव वाचविला. त्यामुळे या बापाच्या शौर्यावर ताहाराबाद गावासह तालुक्यातून कौतुकांचा वर्षाव होत आहे.
————————–
■ नागरिकांनो सावधान, बिबट्या भरवस्तीत घुसतोय?
सध्या साखर कारखान्यांच्या गळीत हंगाम सुरु झाला आहे. शेतकऱ्यांच्या ऊस तोडणीची लगबगही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे उसाच्या शेतात दबा धरून बसलेले बिबटे हे ऊस तोडल्याने आता भरवस्तीस येऊ लागले आहेत. त्यामुळे नागरिकांनो, बिबट्यापासून सावधान रहा. चक्क… बिबट्या भरवस्तीत घुसतोय. त्यामुळे आपण आपली काळजी घेणे गरजेचे आहे.
■ पिंजरा लावुन बिबट्याला जेरबंद करा
बिबट्याची लपण्याची सर्व जागा मोकळी झाल्यामुळे बिबटे दिवसाही फिरत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. तरी वन विभागाने ताबडतोब पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे.
नारायण झावरे, माजी सरपंच, ताहाराबाद