के. बी. रोहमारे राज्यस्तरीय स्मृति करंडकाचे पी. व्ही. पी. महाविद्यालय प्रवरा नगर (लोणी) संघ विजेता !

0

कोपरगाव : के. जे. सोमैया महाविद्यालयाच्या के. बी. रोहमारे स्मृति करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचा मानाचा के. बी. रोहमारे करंडक पी. व्ही. पी. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय प्रवरा नगर (लोणी) संघाने पटकावला. या महाविद्यालयाच्या नितीन जगन्नाथ गागरे व कु. संध्या विष्णू गिधाड यांनी सर्वाधिक गुण मिळवून हा करंडक पटकावला. वैयक्तिक पारितोषिके प्रथम क्रमांक रुपये ९००० /- कु. आदिती अशोक देशमुख (के. जे. सोमैया महाविद्यालय, कोपरगाव) द्वितीय क्रमांक रुपये ७००० /- नितीन जगन्नाथ गागरे (पी.व्ही.पी. महाविद्यालय प्रवरानगर लोणी,) तृतीय क्रमांक रुपये ५००० /- कु. श्रुती अशोक बोरस्ते (एच.पी.टी. महाविद्यालय नाशिक) यांनी तर पाच उत्तेजनार्थ पारितोषिके रुपये १०००/- प्रत्येकी आकाश दत्तात्रय मोहिते (अहमदनगर) संध्या विष्णू गिधाड (प्रवरानगर) शितल बाळासाहेब भोकरे (शिर्डी), योगेंद्र निलेश मुळे (कोपरगाव), व खुशी प्रकाश बागुल (नामपुर) यांनी पटकावले.
यंदा कोपरगाव तालुक्याचे माजी आमदार व संस्थेचे संस्थापक के. बी. रोहमारे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध उपक्रमांबरोबरच ही स्पर्धा देखील भव्य प्रमाणात घेण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन ख्यातनाम कवी व चित्रपट गीतकार प्रकाश होळकर यांच्या शुभहस्ते व कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे, विश्वस्त जवाहर शहा, अॅड. राहुल रोहमारे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या स्पर्धेसाठी के.बी. रोहमारे : कार्य आणि कर्तृत्व, पर्यावरण बदल : शेतकरी हतबल, वेड मोबाईलचे : विस्मरण भविष्याचे व चला जाणूया नदीला ! यासारखे ज्वलंत विषय ठेवण्यात आले होते. राज्यातील २७ स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी सॅमसॉंग नेटटेक प्रा. लि. कंपनीचे चेअरमन संदीप सोमवंशी तसेच कोपरगाव पीपल्स बँकेचे नवनिर्वाचित संचालक सुनील बोरा व सत्येन मुंदडा, संस्थेचे विश्वस्त संदीप रोहमारे, प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करून करंडक, रोख पारितोषिके व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी संदीप सोमवंशी म्हणाले की “कोपरगाव सारख्या ग्रामीण भागातील महाविद्यालयात राज्य पातळीवरची इतकी मोठी स्पर्धा होते हे पाहून मनस्वी आनंद झाला या स्पर्धेच्या माध्यमातून कोपरगाव परिसरातील अनेक नामवंत वक्ते भविष्यात तयार होतील याबद्दल शंका नाही.” कोपरगाव पीपल्स बँकेचे नवनिर्वाचित संचालक सुनील बोरा व सत्येन मुंदडा यांनीही याप्रसंगी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे विश्वस्त संदीप रोहमारे यांनी सर्व स्पर्धेत व विजेत्या स्पर्धकांना पुढील वर्षी नव्या दमाने स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करीत उदंड शुभेच्छा दिल्या. प्राचार्य डॉ . बी. एस. यादव यांनी स्पर्धेमुळे संस्थेच्या व महाविद्यालयाच्या नावलौकिकात विशेष भर पडत असल्याचे प्रतिपादन केले. पारितोषिकांची घोषणा स्पर्धा संयोजक प्रो. जे. एस. मोरे यांनी केली तर आभार डॉ. एस. बी. दवंगे व सूत्रसंचालन डॉ. एस. के. बनसोडे, प्रा. वर्षा आहेर यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख प्रो. व्ही. सी. ठाणगे, डॉ. गणेश देशमुख, डॉ.अभिजीत नाईकवाडे, प्रो. एस. आर. पगारे, प्रो. एस. एल. अरगडे, इतर प्राध्यापक व सेवकांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here