छत्रपती शिवरायांचे चरित्र व शिवराज्याभिषेक सोहळा प्रेरणेचा अखंड स्रोत -विवेक कोल्हे

0

कोपरगाव : रयतेचे लोककल्याणकारी राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे समतेचे पुरस्कर्ते, दूरदर्शी, न्यायप्रिय, सर्वसामान्यांना न्याय देणारे आदर्श नीतिवंत राजे होते. त्यांचे कर्तृत्व, विचार, तत्त्वज्ञान आजही सर्वांना प्रेरणा देतात. शिवराज्याभिषेक सोहळा ही भारताच्या इतिहासातील फार मोठी घटना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र व शिवराज्याभिषेक सोहळा आपल्या सर्वांसाठी प्रेरणेचा अखंड स्रोत आहे, असे विचार संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा सहकारमहर्षी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, युवा नेते विवेक कोल्हे यांनी व्यक्त केले.
संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने कोपरगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात मंगळवारी (६ जून २०२३) रोजी ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा अभूतपूर्व जल्लोषात व मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. यावेळी श्री चरित्र श्री शिवमहापुराण कथाकार प. पू. पंडित ललितजी नागर महाराज (सैंधवा, मध्य प्रदेश), कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे यांच्या सुविद्य पत्नी रेणुकाताई कोल्हे, अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान आदींची प्रमुख उपस्थिती होती. पारंपरिक वाद्यांच्या गजरात व आकाशात मुक्त उधळण करणाऱ्या रंगीबेरंगी फटाक्यांच्या आतषबाजीत रंगलेला, डोळ्यांचे पारणे फेडणारा हा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी कोपरगाव शहर व तालुक्यातील सर्व जाती-धर्मातील शिवप्रेमी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे युवा नेते विवेक कोल्हे यांच्या संकल्पनेतून शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पवित्र नद्यांच्या पाण्याने अभिषेक, मशाल महाआरती आदी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास देशातील विविध ठिकाणाहून आणलेल्या पवित्र नद्यांच्या पाण्याने अठरापगड जातीतील १८ जोडप्यांच्या हस्ते शास्त्रोक्त विधिवत अभिषेक करण्यात आला. नंतर ३५० शिवभक्त जोडप्यांच्या हस्ते मशाली प्रज्वलित करून महाआरती करण्यात आली व फटाक्यांची जोरदार आतषबाजी करून छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यात आली. यावेळी शिवभक्तांनी ‘हर हर महादेव’ ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ च्या गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.
याप्रसंगी प. पू. पंडित ललितजी नागर महाराज म्हणाले, संजीवनी युवा प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या नेत्रदीपक शिवराज्याभिषेक सोहळ्याचा साक्षीदार होण्याचे भाग्य मला लाभले याचा खूप आनंद आहे.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्यगाथा, विचारधारा व धाडसी कार्यशैली आजही प्रेरणादायी आहे. त्यांचे आदर्श विचार आत्मसात करून त्याप्रमाणे मार्गक्रमण केले पाहिजे. सद्य:स्थितीत हिंदू समाजाने जागृत होण्याची गरज आहे. माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा दिला. स्वराज्याची, सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा शिवराज्याभिषेक सोहळा ही भारताच्या इतिहासातील क्रांतिकारक घटना आहे. संजीवनी युवा प्रतिष्ठानने आयोजित केलेला हा अद्वितीय शिवराज्याभिषेक सोहळा कोपरगावकरांच्या कायम स्मरणात राहील. छत्रपती शिवरायांनी सर्व जाती-धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन करून सुराज्य निर्माण केले. पंतप्रधान नरेंद मोदी हे छत्रपती शिवरायांच्या शिकवणीनुसार देशातील गोरगरिबांच्या कल्याणासाठी काम करत असून, त्यांच्या समर्थ नेतृत्वाखाली आपला देश जागतिक महासत्ता होण्याकडे वाटचाल करत आहे. छत्रपती शिवरायांचे जीवनचरित्र आदर्शवत असून, सर्वांनी त्यांचे विचार अंगीकारावेत, असे आवाहन त्यांनी केले.
विवेक कोल्हे म्हणाले, फक्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतभर क्रांतीची ज्योत तेवत ठेवणारे,
इथल्या माणसामाणसात चेतना निर्माण करणारे असे असामान्य युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राजा, कुशल संघटक व उत्तम प्रशासक होते. शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी राजमाता जिजाऊ मांसाहेब यांच्या स्वप्नातील हिंदवी स्वराज्य स्थापन करून अठरापगड जातीच्या लोकांना, बारा बलुतेदारांना सोबत घेऊन रयतेच्या कल्याणासाठी नीतीने राज्यकारभार कसा करावा, याचा आदर्श घालून दिला. बंधुभावाची शिकवण दिली. माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांनी ५० वर्षांपूर्वी संजीवनी साखर कारखान्याच्या वतीने १९७४ साली कोपरगावात गड, कोट, किल्ले यांच्या छायाचित्रांचे व शिवकालीन शस्त्रांचे भव्य प्रदर्शन भरविले होते. शिवराज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्ष आहे. त्यानिमित्त संजीवनी युवा प्रतिष्ठानने शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन भरवले. छत्रपती शिवरायांनी सर्व जाती-धर्मांच्या माणसांना सोबत घेऊन सुराज्य चालवले त्याप्रमाणे त्यांचा आदर्श जोपासत संजीवनी युवा प्रतिष्ठानने आज ३५० जोडप्यांच्या हस्ते मशाल महाआरती, अठरापगड जातीतील १८ जोडप्यांच्या हस्ते जलाभिषेक करून ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा करून अतिशय स्तुत्य उपक्रम राबविला आहे. ‘मशाल’ हे परिवर्तनाचे प्रतीक असून, संजीवनी युवा प्रतिष्ठानचे बोधचिन्हसुद्धा ‘मशाल’ आहे. ‘जागवू ज्योत माणुसकीची’ हा संदेश देत संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सेवक माणसे जोडत समाजासाठी काम करत आहेत याबद्दल त्यांनी सर्व युवा सेवकांचे अभिनंदन केले.
यावेळी भाजपचे शहराध्यक्ष डी. आर. काले, विजय आढाव, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, भाजपचे न.प. तील माजी गटनेते रवींद्र पाठक, शिवसेना नेते कैलास जाधव, माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे, योगेश बागुल, स्वप्नील निखाडे, भाजयुमोचे शहराध्यक्ष अविनाश पाठक, शिवसेनेचे (शिंदे गट) दत्ता पुंडे, महिला आघाडीप्रमुख विमलताई पुंडे, माजी नगरसेवक जनार्दन कदम, अशोक लकारे, जितेंद्र रणशूर, दिनेश कांबळे, भाजप महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा वैशालीताई आढाव, मोनिकाताई संधान, माजी नगरसेविका विद्याताई सोनवणे, हर्षाताई कांबळे, दीपाताई गिरमे, शिल्पाताई रोहमारे, विजया देवकर, नारायणशेठ अग्रवाल, प्रदीप नवले, कैलास खैरे, जयेश बडवे, रवींद्र रोहमारे, राजेंद्र बागुल, बाळासाहेब आढाव, गोपीनाथ गायकवाड, वैभव गिरमे, संदीप देवकर, दीपक जपे, बापू काकडे, सुशांत खैरे, सतीश रानोडे, गोपीनाथ गायकवाड, रंजन जाधव, संतोष गंगवाल, तुषार विद्वांस, प्रसाद आढाव, विक्रांत सोनवणे, किरण सुपेकर, शंकर बिऱ्हाडे, सर्जेराव महाराज टेके पाटील, राहुल सूर्यवंशी, सचिन सावंत, ज्ञानेश्वर गोसावी, गोरख देवडे, संजय खरोडे, सिन्नू भाटिया, कुणाल लोणारी, शुभम भावसार, निखिल जोशी, गौरीश लोहारीकर यांच्यासह भाजप, भाजयुमोचे पदाधिकारी, कार्यकर्ते, संजीवनी युवा प्रतिष्ठानचे सर्व युवा सेवक, शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here