डॉ. तात्याराव लहाने यांचा राजीनामा सरकारकडून मंजूर

0

निवासी डॉक्टरांचे आरोप कायम

मुंबई : मुंबईतील नामांकित सर जेजे सरकारी रुग्णालायातील 9 डॉक्टरांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता. त्यात सुप्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांचाही समावेश होता.

शासनाने हा राजीनामा मंजूर केला आहे. तसंच मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र अभियानाच्या समन्वयक पदाचा करार समाप्त करण्यात आला आहे.

यासंबंधी शासनाने एक परिपत्रक जारी केलं आहे. गेल्या वर्षी 13 डिसेंबरला त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. आता त्यांनी जे.जे. चा राजीनामा दिल्यावर हाही करार संपुष्टात आल्याचं शासनाने म्हटलं आहे.

या विषयावर बीबीसी मराठीशी बोलताना डॉ. तात्याराव लहाने म्हणाले, “माझा राजीनामा शासनाने मंजूर केला आहे. मी शासनाचा आभारी आहे. यापुढे मी वैद्यकीय सेवा देत राहीन. अंबेजोगाई आणि मुरुड येथे काम सुरू राहील. खासगी प्रॅक्टिस सुद्धा सुरू आहे.” तसंच “निवासी डाॅक्टरांनी केलेल्या आरोपांवर मी आधीच बोललो आहे आता मला यावर बोलायचं नाही. आता हा विषय पूर्णतः शासनाचा आहे. ते पाहतील या प्रकरणाचे पुढे काय करायचे,” असंही ते म्हणाले.

डाॅ. रागिणी पारेख यांचा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नेत्रशल्यचिकित्साशास्त्राचे प्राध्यापक डाॅ. रवी चव्हाण यांच्याकडे ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

निवासी डाॅक्टरांनी चार दिवसांपासून पुकारलेला संप आजही सुरूच डाॅ. तात्याराव लहाने आणि डाॅ. रागिणी पारेख यांच्याविरोधात तक्रारी करत जेजे रुग्णालयातील निवासी डाॅक्टरांनी गेल्या चार दिवसांपासून पुकारलेला संप आजही कायम आहे.

डाॅ. तात्याराव लहाने आणि डाॅ. रागिणी पारेख यांच्याविरोधात जेजे रुग्णालयातील नेत्रचिकित्सा विभागातील 28 निवासी डाॅक्टरांनी तक्रार केली आहे. डाॅ. लहाने आणि डाॅ. पारेख निवासी डाॅक्टरांना शिकवत नसून कुठल्याही प्रकारची संधी मिळत नसल्याची तक्रार निवासी डाॅक्टरांनी केली आहे.

डाॅ. लहाने यांचा राजीनामा सरकारने मंजूर केल्यानंतर निवासी डाॅक्टरांनी डाॅ. रागिणी पारेख यांची स्वेच्छानिवृत्ती मंजूर करावी आणि या प्रकरणात चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here