पाल्याच्या प्रगतीचे अवलोकनासाठी आणि त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी पालक मेळावा आवश्यक :मधुकर साबळे

0

के.जे.सोमैया महाविद्यालयात पालक मेळावा संपन्न कोपरगाव :  
“महाविद्यालयात उच्च शिक्षण घेत असलेल्या आपापल्या पाल्याच्या प्रगतीचे अवलोकन करण्यासाठी तसेच त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी पालक मेळावा  आवश्यक आहे. पूर्वी असे मेळावे अपवादाने होत असत. परंतु अलीकडे बदलत्या तंत्रज्ञान व शिक्षण व्यवस्थेच्या काळात असे मेळावे होत आहेत, ही नक्कीच समाधानाची बाब आहे. पालकांनी अशा मेळाव्यांना मोठ्या संख्येने हजर राहून चर्चेत सहभागी झाल्यास आपले पाल्य उद्याच्या भारताचे आदर्श नागरिक घडतील यात शंका नाही.” असे प्रतिपादन पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष मधुकर साबळे यांनी येथे केले. स्थानिक के. जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रहमारे कनिष्ठ महाविद्यालय पालकशिक्षक संघ आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पालक मेळाव्याचे प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
 साबळे पुढे म्हणाले की, “उच्च शिक्षण घेणारा आपला पाल्य महाविद्यालयात नेमके काय करतो हे जाणून घेण्यासाठी आपण वेळोवेळी महाविद्यालयात येऊन प्राध्यापकांशी संवाद साधला पाहिजे. त्याचबरोबर आपल्या पाल्याची उत्तम जडणघडण व्हावी यासाठी पालकांनी वरचेवर महाविद्यालयात आले पाहिजे.”
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त संदीपराव रोहमारे म्हणाले की, “सर्व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाविद्यालयाचे प्रशासन, अध्यापनाबद्दल जी कौतुकाची थाप दिली त्याबद्दल मी आपला ऋणी आहे. आमच्या संस्थेत प्राध्यापकांची निवड करताना त्यांची अभ्यासू वृत्ती, व्यासंग आणि ज्ञान यांना प्राधान्य दिले जाते. याचे श्रेय मी संस्थेचे अध्यक्ष मा .अशोकराव रोहमारे व सचिव मा .एडवोकेट संजीव कुलकर्णी यांना देतो.” महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांविषयी आपण ज्या अपेक्षा व्यक्त केल्या त्या ताबडतोब पूर्ण करण्यासाठी महाविद्यालय प्रशासन प्रयत्न करेल. आमच्या महाविद्यालयात जर्मन आणि फ्रेंच भाषा  शिकवण्यासाठी आम्ही बाहेरगावच्या महाविद्यालयातून प्राध्यापकांची नेमणूक केली होती. परंतु विद्यार्थी संख्याअभावी नंतर ते वर्ग बंद करावे लागले. भविष्यात विद्यार्थीसंख्या असल्यास विदेशी भाषा अध्यापनाची उत्तम व्यवस्था केली जाईल, याची मी ग्वाही देतो. विद्यार्थ्यांच्या बसची समस्या लक्षात घेऊन आम्ही यापूर्वीच कोपरगाव बस डेपो च्या व्यवस्थापकांची भेट घेतलेली आहे. बस डेपोचे मा. व्यवस्थापकांनी चारपाच नवीन बसेस सुरू करण्याची हमी देखील दिलेली आहे. विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाच्या गेटवरून बसची सुविधा  देण्यास प्राधान्य दिले जाईल.”
प्रा. चंद्रशेखर जोशी म्हणाले की, “सोमैया महाविद्यालय म्हणजे उत्तमप्रशासन,  प्रशस्त इमारती, समृद्ध ग्रंथालय, सुसज्ज प्रयोगशाळा असलेले एक दर्जेदार महाविद्यालय होय. माझा पाल्य गेल्या तीनचार वर्षापासून येथे शिक्षण घेत आहे. त्याच्याशी संवाद करताना कॉलेजबद्दल बऱ्याच नाविन्यपूर्ण बाबी लक्षात आल्या. या महाविद्यालयात कुशल प्राध्यापक वर्ग तसेच निपुण कार्यालयीन सेवकवृंद असल्याने विद्यार्थ्यांचे प्रश्न त्वरित सोडविले जातात. वरिष्ठ महाविद्यालयात देखील जादा तास घेतले जातात. विद्यार्थी आणि प्राध्यापकांचे संबंध मुले आणि आई-वडील अशा प्रकारचे आहेत ही नक्कीच अभिमानास्पद बाब आहे.”
उपस्थित पालकांचे स्वागत करताना प्राचार्य डॉ. बी. एस. यादव म्हणाले की, “आमच्या या महाविद्यालयात सात हजार विद्यार्थी शिक्षण घेतात तर जवळपास 300 प्राध्यापक अध्यापनाचे कार्य काम करतात. भविष्यात येऊ घातलेल्या नवीन शिक्षण पद्धतीतील क्रांतिकारी बदल डोळ्यासमोर ठेवून आमची वाटचाल सुरू आहे. आपल्या विश्वासाला तडा जाऊ न देता आम्ही भविष्यात देखील उत्तम काम करत राहू याची ग्वाही आपणास देतो. ग्रामीण भागातील अत्यंत विषम परिस्थितीतून येणारा विद्यार्थी आणि त्याच्या गरजा ओळखून त्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रामाणिक प्रयत्न करण्याचे आमचे ध्येय आहे. उच्च शिक्षण घेतल्यानंतर संशोधन करण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दूरच्या शहरात जावे लागू नये यासाठी संस्थेने महाविद्यालयात सात विषयांची संशोधन केंद्र सुरू केली असून त्यामध्ये सध्या 300 संशोधक संशोधन कार्य  करीत आहेत. पदवी प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांना नोकरी मिळते की नाही याचाही आढावा हे महाविद्यालय घेते आणि विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असते.”
याप्रसंगी पालकांच्या वतीने श्री संजय कट्टे, श्री बाळासाहेब मोरे, श्रीमती उज्वला बेलदार, श्रीमती शांताबाई कुलथे आदींची समयोचित भाषणे झालीत.  बाळासाहेब मोरे म्हणाले की, “माझी मुलगी याच महाविद्यालयात शिकली व याच महाविद्यालयात प्राध्यापक झाली ही माझ्यासाठी सर्वाधिक आनंदाची बाब आहे. माझे पाल्य आठ वर्ष या महाविद्यालयात शिक्षण घेत होते.” तर श्रीमती उज्वला बेलदार म्हणाल्या की, “या महाविद्यालयात शिक्षण घेतल्यामुळेच माझ्या पाल्याने मुंबईत झालेल्या पोलीस भरती मध्ये मैदान जिंकले.” श्रीमती शांताबाई कुलथे आणि बीड येथून आलेले निलेश मुळे म्हणाले की, “या महाविद्यालयांतील प्राध्यापकांच्या मार्गदर्शनामुळे आमचे पाल्य चांगले वक्ते बनले आहेत, त्यामुळे हे महाविद्यालय म्हणजे एक परीस आहे. इथे शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्याचे सोनेच होईल.”
मेळाव्याचे प्रास्ताविक समन्वयक प्रो. संजय अरगडे यांनी केले तर अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रोफेसर विजय ठाणगे यांनी उपस्थितांचे आभार मानले. प्रा. वर्षा आहेर व प्रा. अशोक सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. या मेळाव्याला एकूण 106 पालक उपस्थित होते. त्याचबरोबर प्राध्यापक वृंद बहुसंख्य विद्यार्थ्यांनीही मेळाव्याला हजेरी लावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here