राहुल गांधींच्या घरी दिल्ली पोलीस दाखल, काँग्रेसकडून विरोध

0

नवी दिल्ली : भारत जोडो यात्रेत महिलांवर होत असलेल्या लैंगिक अत्याचारासंदर्भात टीका प्रकरणी राहुल गांधी यांच्या घरी दिल्ली पोलीस दाखल झाले आहेत.या प्रकाराचा काँग्रेस पक्षाने निषेध व्यक्त केला असून दिल्ली पोलिसांच्या कारवाईविरोधात कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन सुरू केलं आहे.

दिल्लीचे कायदा आणि सुव्यवस्था विशेष आयुक्त सागर प्रीत हुडा यांनी यासंदर्भात बोलताना म्हटलं, “दिल्ली पोलिसांची राहुल गांधींसोबत एक बैठक सुरू आहे. आम्ही त्यांना जी माहिती मागितली, ती ते आम्हाला देतील. आम्ही त्यांना एक नोटीस पाठवली असून त्यांच्या कार्यालयाने ती नोटीस स्वीकारलीही आहे.”

त्यांनी पुढे म्हटलं, “आम्ही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला, पण आम्हाला कोणतीही माहिती मिळाली नाही. आज तिसऱ्यांदा त्यांच्या घरी पोलीस गेले. पण राहुल गांधी यांनी अद्याप आम्हाला कोणतीही माहिती दिली नाही.”

विशेष आयुक्त सागर प्रीत म्हणाले, “30 जानेवारी रोजी श्रीनगरमध्ये राहुल गांधींनी म्हटलं होतं की त्यांना भारत जोडो यात्रेदरम्यान अनेक महिला येऊन भेटल्या होत्या. या महिलांवर बलात्कार झाल्याचं त्यांचं म्हणणं होतं. पण आता त्यांना यासंदर्भात माहिती जमा करण्यास वेळ लागू शकतो. पण ते लवकरच याविषयी माहिती देतील.”

राहुल गांधी यांच्या घरी पोलीस दाखल झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने केंद्र सरकारवर टीका केली आहे.

काँग्रेसने म्हटलं की राहुल गांधी यांनी नोटिशीचं उत्तर देण्याचं मान्य केलं असताना त्यांच्या घरी पोलीस का आले?”

दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी यांच्या बलात्कारसंदर्भातील वक्तव्यावरून त्यांना एक नोटीस पाठवली होती. या नोटिशीत त्यांनी राहुल गांधींना काही प्रश्नांची उत्तरे मागितली होती.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी म्हटलं, “गृह मंत्रालय आणि वरून आदेश आल्याशिवाय पोलीस हे पाऊल उचलतील, हे मुळीच शक्य नाही. राहुल गांधींनी नोटीस मिळाल्याचं मान्य केलं, त्याचं उत्तर देऊ, असं सांगितलं. तरीसुद्धा पोलीस त्यांच्या घरी पोहोचले.”

ते पुढे म्हणाले, “घरपर्यंत पोहोचण्याचं पोलिसांचं धाडस कसं झालं. त्यांचं कृत्य संपूर्ण देश पाहत आहे. देश त्यांना माफ करणार नाही. आजचं हे कृत्य खूपच गंभीर आहे.”

काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा म्हणाले, “आम्ही या प्रकाराला कायदेशीर उत्तर देऊ. असं घरपर्यंत पोहोचणं कितपत योग्य आहे? भारत जोडो यात्रा संपून आज 45 दिवस झाले. पण त्याबाबत आता विचारलं जात आहे. सरकार घाबरलं आहे, हेच यामधून दिसून येतं. आतासुद्धा मला आत जाण्यापासून रोखण्यात आलं. त्याचं कारण काय? हा एक रस्ता आहे. इथून कुणीही ये-जा करू शकतो.”

तर काँग्रेसचे संपर्कप्रमुख जयराम रमेश यांनीसुद्धा पोलिसांच्या कारवाईविरोधात टीका केली आहे.

ते म्हणाले, “भारत जोडो यात्रा संपून 45 दिवस झाले. ते आता उत्तर मागत आहेत. त्यांना एवढीच काळजी होती, तर तेव्हाच ते राहुल गांधींकडे का गेले नाहीत? राहुल गांधी यांची कायदा सल्लागार टीम या प्रकरणात कायदेशीर उत्तर देईल.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here