श्रीराम जन्मोत्सव आश्वी बुद्रुक येथे उत्साहात साजरा

0

संगमनेर : ‘जय श्रीराम’चा जयघोष, सनई, टाळ व मृदुंगाच्या मधुर स्वरात प्रभु श्री राम जन्म महोत्सव संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक याठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पारंपरिक संबळ वाद्य व तरुण – तरुणींच्या लेझीम पथकाने यावेळी भाविकाचे लक्ष वेधले. यावेळी रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. चित्तथरारक टांगा शर्यती हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले.

         आश्वी बुद्रुक येथील पुरातन काळातील प्रभु श्रीराम, बंधु लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांचे एकत्रीत महाराष्ट्रातील एकमेव असलेल्या मंदिरात (राम नवमी) श्री राम जन्मसोहळा गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी सकाळी श्रीराम मंदिरापासुन श्रीरामाच्या पादुकासह पालखी मिरवणूक काढण्यात आली. यात अग्रभागी पारंपरिक संबळ वाद्य, तरुण – तरुणीचे लेझीम पथक, भगवे झेंडे घेतलेले तरुण, महिला, पुरुष, पालखी, रथ, टांगा अशी पालखी मिरवणूक गावातील मुख्य रस्त्यावरून जय श्रीरामाचा जय घोष करत राम मंदिरात पोहचली. या ठिकाणी भजनी मंडळ व महिला मंडळाने भजन करत जन्म गीते गायली. श्रीराम मंदिरावर आकष॔क विद्युत रोषणाई करण्यात आली होती. बारा वाजता राम जन्म झाल्यावर पंजरी (सुठ, धने, गुळ, खोबरे व साखर यांचे मिश्रण) भाविकांना वाटण्यात आले. तर राम भक्त तरुणांकडून लाडूचा महाप्रसाद वाटप करण्यात आला.दरम्यान दुपारी चित्तथरारक व डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या टांगा शर्यतीचे तसेच भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी भव्य राम जन्म उत्सव मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी आश्वीसह पंचक्रोशीतील गावांमधील तरुण व भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here