सातारा : सातारा-जावळी मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे अधिकृत फेसबुक पेज अज्ञात हॅकरने २३ ऑगस्ट २०२३ रोजीच हॅक केलेले आहे; परंतु सुमारे ११ महिन्यांनंतर या पेजवर संबंधित हॅकरने अश्लील पोस्ट टाकण्यास सुरुवात केली आहे.
या हॅकरचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. या पेजवरील पोस्ट व मजकुराकडे कोणीही लक्ष देऊ नये, तसेच सोशल मीडियावरील सर्वांनीच हे पेज अनफाॅलो करून ब्लॉक करावे, असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वतीने त्यांचे जनसंपर्क अधिकारी अमर मोकाशी यांनी केले आहे.
ऑगस्ट २०२३ मध्ये हे पेज हॅक केले होते. आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून याबाबतची रीतसर तक्रार त्याचवेळी सातारा सायबर सेलकडे करण्यात आली होती. या पेजवर कोणतीही अनधिकृत पोस्ट पडल्यास त्याला संबंधित हॅकर जबाबदार असेल, तसेच अनधिकृत पोस्ट पडल्यास आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कार्यकर्ते, प्रेमी, फॅन्स, नागरिकांनी त्यावर कसलीही प्रतिक्रिया देऊ नये, असे आवाहन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून त्याचवेळी करण्यात आले होते.
दरम्यान, सुमारे ११ महिने या फेसबुक पेजवर कोणतीही पोस्ट पडली नव्हती. मात्र, अलीकडे म्हणजेच २० जुलै २०२४ रोजी दुपारी ३ नंतर या पेजवर हॅकरने अश्लील पोस्ट टाकण्यास सुरुवात केली आहे.