कराड : सातारा जिल्ह्यात कऱ्हाड तालुक्यातील सह्याद्री साखर कारखान्यानजीक वडोली निळेश्वर हे सुमारे २५०० लोकसंख्येचे गाव आहे. येथील बाळासाहेब श्रीरंग पवार यांची प्रगतिशील शेतकरी अशी ओळख आहे.त्यांची १४ एकर शेती आहे. पूर्वी हा भाग दुष्काळी असल्याने जिरायती शेतीच ते करायचे.
सन २००५ मध्ये आरफळ योजनेअंतर्गत ‘कॅनॉल’च्या माध्यमातून पाणी आले. मग शेतीला टप्प्याटप्प्याने बागायती स्वरूप देण्यास व जमीन ओलिताखाली आणण्यास सुरुवात केली. विहीर बांधली. त्याच्या पाणीपातळीत वाढ झाली.
शेतात पाणी खेळू लागले. आज बाळासाहेब वयस्कर झाले आहेत. त्यांचे सुनील, अविनाश, नीलेश हे तीन मुलगे शेतीची जबाबदारी पाहतात. चुलत बंधू किशोर अशोक पवार नारळाचा ठोक व्यवसाय करतात. सुनील सह्याद्री साखर कारखान्यातील नोकरी सांभाळून शेती पाहतात.
प्रवाह ओळखून शेतीत बदल
सुनील व त्यांच्या बंधूंना मजूरसमस्या जाणवत होत्या. त्यामुळे कामे वेळेत होत नव्हती. अपेक्षित उत्पादन वाढ मिळत नव्हती. सध्याचा प्रवाह आधुनिक तंत्रज्ञानाचा व यांत्रिकीकरणाचा आहे हे समजून त्यानुसार पाऊल टाकण्यास त्यांनी सुरुवात केली. प्रगतिशील शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी व मार्गदर्शन घेण्यास सुरुवात केली. खर्चाचा आकडा लक्षात घेऊन व त्यावर नियंत्रण ठेऊन उत्पन्न वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवले. जमिनीच सेंद्रिय कर्ब तसेच सुपीकता वाढविण्यावर भर दिला.
सुधारित व्यवस्थापनातील मुख्य बाबी
दरवर्षी किमान चार एकर आडसाली उसाची व को ८६०३२ वाणाची लागवड.रोपे पद्धतीने लागवड. आष्टा येथील नर्सरीतून रोपे आणून पाच बाय दीड फूट अंतरावर लागवड.यंदा दोन ओळींतील अंतर सहा फूट ठेवले आहे. या बदलामुळे पिकास सूर्यप्रकाश व खेळती हवा मिळण्यास मदत झाली आहे.
लागवडीपासून १५० दिवसांनी व त्यानंतर ६० दिवसांनी पाचट काढून त्याचा सरीत खत म्हणून होतो वापर. एकरी युरिया दोन पोती व सिंगल सुपर फॉस्फेट दोन पोती असा पाचट कुजविण्यासाठी वापर.
कारखान्याकडील कंपोस्ट, शेणखत तसेच पोल्ट्रीखताचा वापर.
काळ्या रानात फक्त खोडव्याचे पीक घेतले जाते. खोडव्यानंतर हळद, आले आदी पिके घेऊन फेरपालट केली जाते. ‘रोटेशन’ पद्धतीने वेगवेगळ्या प्लॉटमध्ये लागवडीचे नियोजन असल्याने जमिनीची सुपीकता ठेवण्याचा होतो प्रयत्न. हरभरा पाल्याचाही खत म्हणून होतो वापर.
मिळतेय उच्चांकी उत्पादन
सुधारित व्यवस्थापानातून सुनील यांनी एकरी ८०, ९० ते शंभर टन उत्पादनापर्यंत पल्ला गाठला. सन २०२१ मध्ये एकरी १२४ टन, तर मागील वर्षी सर्वाधिक १२८ टनांपर्यंत उत्पादन त्यांनी मिळवले आहे. उत्पादन खर्च किमान सव्वा लाख रुपये होतो. खोडव्याचे ५५ ते ६० टनांपर्यंत उत्पादन मिळते. कारखान्याकडून प्रति टन ३१०० रुपयांच्या आसपास दर मिळतो.