उस उत्पादन वाढीसाठी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याची जागरूकता-बिपीनदादा कोल्हे

0

कोपरगाव दि. २१

            सध्याचा काळ स्पर्धेचा आहे. दिवसेंदिवस उसाचे प्रतिएकरी उत्पादन आणि साखर उतारा घटतो आहे त्यासाठी शेतक-यांनी नेमकेपणाने काय केल्याने उसाचे प्रति एकरी उत्पादन वाढेल यासाठी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने सतत जागरूकता ठेवुन त्यानुरूप कार्यक्षेत्रातील सभासद शेतक-यांना उस विकासात्मक कालबध्द कार्यक्रम आखून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी शेतक-यांच्या बांधावर केली जात असल्याचे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले. कारखान्याच्या उस विकास विभागाअंतर्गत प्रत्येक गटात प्रयोगशिल शेतकरी निवडुन त्यांचे उस उत्पादन वाढीचे नियोजन हाती घेतल्याचेही ते म्हणाले. 

           सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना व डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कारखाना कार्यस्थळावर शुक्रवारी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते.

             या मेळाव्यात उस शास्त्रज्ञ डॉ. सुरेश पवार, डॉ. बाळकृष्ण जमदग्नी, डॉ. निळकंठ मोरे, डॉ. डी. डब्ल्यु. ढवाळ, डॉ. एम. व्ही बोखारे, कृषीरत्न संजीव माने यांनी उपस्थित शेतक-यांना जमिनीच्या मशागतीपासून उस लागवडीपर्यंत खत व्यवस्थापन, किड नियंत्रण आदि सर्व शास्त्रोक्त पध्दतीने माहिती देवून क्षारपड चोपण जमिनीची उत्पादकता, आडसाली. पूर्वहंगामी, खोडवा उस उत्पादन वाढ कार्यक्रमांत काय काळजी घ्यायची याचे सचित्रासह माहिती देवून शेतक-यांचे शंका समाधान केले. 

            प्रारंभी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांच्या संकल्पनेतुन तयार करण्यात आलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रति एकरी उस उत्पादन वाढ कार्यक्रम पुस्तीकेचे संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, उपाध्यक्ष रमेश घोडेराव, संचालक सर्वश्री, विश्वासराव महाले, मनेष गाडे, निलेश देवकर, बापूराव बारहाते, त्रंबकराव सरोदे, रमेश आभाळे, सतिष केकाण, बाळासाहेब वक्ते, ज्ञानदेव औताडे, संजय औताडे, बाळासाहेब पानगव्हाणे, बापूसाहेब औताडे आदिच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. 

            कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार याप्रसंगी बोलतांना महणाले की, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यात देशपातळीवर आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून आगामी काळात निर्माण होणा-या स्पर्धेला सामोरे कसे जायचे याचा कालबाद कार्यक्रम आखला आहे. साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे यांनी प्रास्तविकांत कोल्हे कारखान्याने सभासद शेतक-यांचे प्रति एकरी उसाबरोबरच अन्य पीकउत्पादन वाढीसाठी काय काय उपाययोजना केल्या आहेत, यासह कार्यक्षेत्रात एकरी सुमारे ७५ ते ११६ मे. टन उस उत्पादन घेणा-या सभासद शेतक-याबददल माहिती दिली.

      बिपीनदादा कोल्हे पुढे म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी कार्यक्षेत्रातील प्रत्येक सभासद शेतक-यांचे प्रती एकरी उसाचे उत्पादन वाढले पाहिजे यासाठी कालबध्द कार्यक्रम आखून शेतक-यांच्या बांधावर जात मेळावे घेवुन प्रबोधन केले आहे. राज्यातील बहुतांष साखर कारखान्यांचे आधुनिककरण होवुन दैनंदिन गाळप क्षमता वाढविण्यांत आल्या आहेत त्यामुळे चालू व पुढील हंगामात गाळपासाठी मोठया प्रमाणांत उसाची गरज भासणार आहे. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने आगामी धोके लक्षात घेवुन त्यानुरूप पावले टाकली आहेत. उस वाढीसाठी धडक कृती कार्यक्रम आखून उत्कृष्ट बेणे पुरवून शेतकी विभागातील कार्यरत प्रत्येकी एका कर्मचा-यास दहा शेतकरी निवडुन त्यांचे लागवडीपासून ते थेट कारखान्यांत उस गाळपास तुटून येईपर्यंतचे नियोजन आखून देण्यांत आले आहे. मागील हंगामात त्याचे चांगले परिणाम जाणवले. 

           उस साखर कारखानदारीत शास्त्रज्ञांनी त्यांच्याकडील ज्ञान शेतक-यांच्या बांधापर्यंत नेण्यांसाठी कालबध्द आखणी करावी. जगाच्या तुलनेत भारतीय शेतकरी उस उत्पादन आणि साखर उता-यात कितीतरी मागे आहे. ब्राझील आणि भारत या दोन देशात जमिन आसमानचा फरक आहे. आज तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे. काळाची पावले ओळखून सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांने देशात सर्वप्रथम उपग्रहाद्वारे उस तोडणीसह अन्य नियोजन यशस्वी पुर्ण केले आहे. उसाच्या रसापासून इथेनॉलची निर्मीतीही देशात फक्त सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यातच होत आहे.

           साखर उद्योग हा भारतातील सर्वात मोठा उद्योग आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, सहकारमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांचे सर्व मंत्री साखर उद्योगात स्थैर्य आणि आर्थीक सुबत्ता वाढविण्यावर भर देत आहे. 

            ग्रामिण भागातील मुला मुलींना अभियांत्रीकी तांत्रीक अभ्यासकमाबरोबरच व्यवस्थापनाचे सर्वोत्कृष्ट शिक्षण येथे मिळावे यासाठी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी संजीवनी एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली त्यातून पाच हजाराच्यावर विद्यार्थी अंतराळ संशोधन संस्था नासासह जगाच्या कानाकोप-यात काम करत आहे, ज्ञानाने समृध्द झाल्यानेच ते अलोकीक कार्य करत आहेत तद्वत शास्त्रज्ञांच्या ज्ञानातुन उसाबरोबरच अन्य पिकांचे उत्पादन वाढून येथे सुबत्ता निर्माण होण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान शेतक-यांच्या बांधापर्यंत पोहोचवावे ही अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उस व्यवस्थापक जी. बी. शिंदे, उस विकास अधिकारी शिवाजीराव देवकर, सी. एन. वल्टे यांनी करून उपस्थितांचे आभार मानले. कृषिरत्न संजीव माने यांनी एकरी शंभर ते दीडशे टन उस उत्पादन सहज शक्य असून त्यासाठी काय उपाययोजना करावयाच्यायाबाबतचे सौदाहरण स्पष्टीकरण यावेळी केले. उस शेतीतील शेतक-यांच्या यशोगाथा सचित्रफितीद्वारे यावेळी दाखविण्यांत आल्या. कारखान्याचे सभासद शेतकरी व शेतकी विभागाचे सर्व कर्मचारी यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here