कोल्हापूर;आजरा तालुक्यातील १ हजार लाभार्थी ‘आनंदाचा शिधा’पासून वंचित

0

सोहाळे : राज्य शासनाकडून गौरी-गणपती सणानिमित्त 100 रुपयांत देण्यात आलेल्या आनंदाचा शिधाचे आजरा तालुक्यातील 20 हजार 611 अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य लाभार्थी कुटुंब शिधापत्रिकाधारकांना वाटप करण्यात आले. तालुक्यासाठी 95 टक्केच शिधा उपलब्ध झाला होता. त्यापैकी आतापर्यंत जवळपास 99.32 टक्के शिधाचे वाटप करण्यात आले आहे. मात्र, तरीदेखील अजूनही तालुक्यातील 1 हजार 86 लाभार्थी कुटुंब या आनंदाचा शिधापासून वंचितच राहिले आहेत.

शंभर रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय राज्य शासनाने यापूर्वीच घेतला आहे. त्यानुसार गेल्यावर्षी दिवाळीला, त्यानंतर गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त हा शिधा वाटप झाला. यंदाही राज्य शासनाने गौरी-गणपती आणि दिवाळी सणानिमित्त आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेवून सदरचा शिधा वाटप करण्याचा आदेश अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत पुरवठा अधिकाऱ्यांना देण्यात आला. त्यानुसार नियुक्त केलेल्या एजन्सीकडून निश्चित केलेल्या संख्येनुसार संच प्रत्येक तालुक्याला पोहचविण्यात आले. व कालावधीतच वाटप पूर्ण करण्याच्या सुचनाही करण्यात आल्या. गतवर्षी दिवाळी झाल्यानंतर आनंदाचा शिधा लाभार्थी कुटुंबाच्या हाती पडला होता. यावर्षी तो सणासुदीतच उपलब्ध व्हावा, यासाठी शिधा वाटपाचे नियोजनही करण्यात आले होते. आजरा तालुक्यात 21 हजार 856 अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य लाभार्थी कुटुंबे आहेत. मात्र, या सर्व लाभार्थी कुटुंबांना आनंदाचा शिधा उपलब्ध झाला नाही. लाभार्थी कुटुंबांपैकी 95 टक्केच म्हणजे 20 हजार 770 लाभार्थी कुटुंबांना आनंदाचा शिधा उपलब्ध झाला. उपलब्ध एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो चणाडाळ आणि एक किलो खाद्यतेल असा चार वस्तूंचा आनंदाचा शिधा आतापर्यंत 20 हजार 611 लाभार्थी कुटुंबांना पोहोचला आहे.
गतवर्षीचा अनुभव पाहता यंदा राज्य शासनाने प्रत्येक लाभार्थी कुटुंबाला आनंदाचा शिधा पोहोचेल, अशी यंत्रणा लावण्याचा प्रयत्न केला असला तरी अनेक लाभार्थी कुटुंब हे आजही यापासून वंचितच आहेत. गौरी-गणपती सण झाला तरी आजरा तालुक्यातील 1 हजार 86 लाभार्थी कुटुंब आजही आनंदाचा शिधापासून वंचितच आहे. अशा लाभार्थी कुटुंबांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. उपलब्ध आनंदाचा शिधा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याकरिता तहसिलदार समीर माने यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसिलदार म्हाळसाकांत देसाई, विकास कोलते व पुरवठा अधिकारी शेख यांनी विशेष परिश्रम घेतले.

दिवाळी सणाला तरी आनंदाचा शिधा मिळणार का?

दिवाळी सणाला दिला जाणारा आनंदाचा शिधा या महिनाअखेर उपलब्ध होईल, असे सांगण्यात येते. यामध्ये एक किलो पामतेल, एक किलो साखर, अर्धा किलो रवा, अर्धा किलो मैदा, अर्धा किलो चणाडाळ व अर्धा किलो पोहे असा संच देण्यात येणार आहे. किमान दिवाळीला तरी आनंदाचा शिधाचा लाभ मिळणार काय? असा प्रश्न गौरी-गणपती सणाला आनंदाचा शिधा न मिळालेल्या लाभार्थी कुटुंबांमधून उपस्थित होत आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here