जत : ग्रामीण भागातील घराघरात जुन्या काळात वापरली जाणारी तांब्या पितळेची, मातीची तसेच ॲल्युमिनियमची मोठ-मोठी भांडी केवळ शोपीस बनवून राहिली आहेत सध्याच्या काळात या भांड्यांचा वापर लोक करत नसले तरी त्यांचे जतन मात्र अनेक ठिकाणी केल्याचे पहावयास मिळत आहे.
जुन्या काळामध्ये स्वयंपाक घरात तांबे, पितळ, ॲल्युमिनियम धातूची घागर,पिंप, ग्लास, ताट, वाटी, तांब्या, मोठमोठाले तांब्याचे हांडे तसेच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मातीचे माठ, मोगा, घट, तरळ अशी वेगवेगळ्या प्रकारची भांडी वापरली जात असत. या सर्व प्रकारच्या भांड्यांनी स्वयंपाक घरातील लाकडी कपाट सजलेले दिसायचे.
थंड पाण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये प्रत्येक घराच्या अंगणात मोठा रांजण मातीच्या कट्ट्यामध्ये बसवलेला पहावयास मिळायचा. दूरवरून पाणी आणण्यासाठी पत्र्याच्या घागरी वापरले जायच्या. प्रत्येक घराघरात तांब्याच्या घागरीतील तसेच पिंपातील पाणी पिले जायचे. हे पाणी आरोग्यास हितकारक ठरवायचे.
काळ बदलला तसा जमाना बदलला या म्हणीप्रमाणे सध्याच्या आधुनिक जगामध्ये ही भांडी कालबाह्य झाल्याचे पहावयास मिळत आहे. जुन्या काळात स्वयंपाक घरातील वैभव असलेली ही भांडी सध्या वापराविना अडगळीत पडल्याचे पहावयास मिळत आहे. अनेक घरातून या भांड्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
स्वयंपाक घरात या सर्व जुन्या भांड्यांचा दररोज वापर होता. जुन्या स्त्रिया या भांड्यांची स्वच्छता ही ठेवायच्या. मात्र अलीकडच्या काळात या भांड्यांचा वापर होत नाही.या भांड्यांकडे पाहिले की आम्हांला पूर्वीचे दिवस आठवतात. – आक्काताई खोत, जेष्ठ गृहिणी, खवरेवाडी