नाशिक : नाशिक शहरासह ग्रामीण भागाला दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने (Heavy Rain) चांगलेच झोडपले आहे. यामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. तर जिल्ह्याच्या धरणांमधील पाणीसाठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. गंगापूर धरणासह (Gangapur Dam) सहा धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
शहरासह त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा, दिंडोरी या तालुक्यांत कालपासून संततधार पाऊस सुरु आहे. अनेक भागांत मंदिरे, पुल, रस्ते आणि स्मशानभूमी पाण्याखाली गेल्याचे चित्र असून अनेक गावांचा संपर्क देखील तुटला आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिरात पाणी शिरले
त्र्यंबकेश्वर तालुक्याला पावसाने चांगलेच झोडपले आहे. यामुळे त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील रस्त्यांना नद्यांचे रूप आले आहे. मंदिराच्या दक्षिण दरवाजाच्या पायऱ्यांवरून मंदिर परिसरात पाणी शिरले. यामुळे दक्षिण दरवाजाजवळील गायत्री मंदिर देखील पाण्याखाली गेले. यावेळी पाण्याबरोबरच कचरा देखील वाहत आल्याचे दिसून आले. यामुळे देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांची मोठी गैरसोय झाली. त्र्यंबकेश्वर मंदिरासह बाजारपेठ, मेनरोड, तेली गल्लीत देखील पाणी शिरले आहे. उद्यापासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. उद्या पहिला श्रावणी सोमवार आहे. श्रावणाच्या आदल्या दिवशीच बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असणाऱ्या त्र्यंबकेश्वरच्या नगरीत मुसळधार पाऊस सुरू असल्याने भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाला मोठे परिश्रम घ्यावे लागणार आहेत.