व्यवस्थापनाच्या आडमुठेपणामुळे कंत्राटी कामगारांची मिटींग निष्फळ.
उरण दि २१(विठ्ठल ममताबादे ) : भारतीय मजदूर संघाशी संलग्न महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने वेतन वाढ व हरियाना सरकार प्रमाणे वीज उद्योगात कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार मिळावा या व अन्य प्रमुख मागण्यासाठी राज्यभर साखळी उपोषण व २० ऑगस्ट २०२४ रोजी सर्व मंत्री महोदयांच्या घरासमोर जोरदार निदर्शने झाली. २४ ऑगस्ट रोजी निर्धारित रेशीमबाग ते ऊर्जामंत्री निवास मोर्चा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अप्पर मुख्य सचिव ऊर्जा आभा शुक्ला यांनी तिन्ही वीज कंपन्यांचे व्यवस्थापकिय संचालका सोबत महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या प्रतिनिधीची मंगळवार दि. २० ऑगस्ट रोजी मंत्रालयात बैठक आयोजित केली होती.
मात्र या बैठकीत ठोस आश्वासन न मिळाल्याने कामगार आंदोलनावर ठाम आहेत. दरवेळी आश्वासन दिले जाते त्याचे पालन होत नसल्याने आता ठोस लिखित आश्वासन द्यावे या साठी शनिवार दि.२४ ऑगस्ट २०२४ रोजी नागपुरातील रेशीमबाग मैदान ते ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी पायी मोर्चा काढून तेथे मागण्या मान्य होई पर्यंत आमरण उपोषण करण्याचा निर्धार राज्यातील सर्व वीज कंत्राटी कामगारांनी केला असून या आंदोलनात राज्यातील सर्व वीज कंत्राटी कामगारांनी २४ तारखेला नागपूरला यावे असे आवाहन महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे अध्यक्ष निलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी केले आहे.
या बैठकीला भारतीय मजदूर संघाचे प्रदेश अध्यक्ष अनिल ढुमणे, वीज कंत्राटी कामगार संघाचे अध्यक्ष निलेश खरात, सरचिटणीस, सचिन मेंगाळे, कार्याध्यक्ष अमर लोहार, उपाध्यक्ष मोहन देशमुख उपस्थित होते.