
संगमनेर : युवराज छत्रपती संभाजीराजे हे संगमनेर तालुक्यातील ऐतिहासिक पेमगिरी भूमीत आज गुरुवार दिनांक १७ नोव्हेंबर रोजी आयोजित राष्ट्रीय छावा संघटनेच्या मेळाव्याला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे संगमनेर तालुक्यात शिवप्रेमी मध्ये उत्साह संचारला असून या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन छावाचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रवीण कानवडे यांनी केले आहे.
आज गुरुवारी सकाळी ११ वाजता तालुक्यातील पेमगिरी येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या पटांगणात छावा संघटनेचा हा मेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यात युवराज छत्रपती संभाजीराजे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या वेळी माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात, नाशिक पदवीधर मतदार संघाचे आ. सुधीर तांबे, राजहंस दूध संघाचे चेअरमन रंणजीतसिंह देशमुख, राष्ट्रीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर काळकुटे, प्रदेशाध्यक्ष निखिल गोळे राज्य, जिल्हा, तालुका पातळीवरील मान्यवरासह संघटनेचे सर्व पदाधिकारी, सरपंच व उपसरपंच उपस्थित राहणार आहेत.शहाजीराजे व राजमाता जिजाऊ यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले संगमनेरच्या ऐतिहासिक भूमीत तब्बल ४०० वर्षानतंर छत्रपती घराण्याचे वशंज येत असल्याने या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी शिवप्रेमीमध्ये उत्साह संचारला आहे. याप्रसंगी छत्रपती संभाजीराजे मराठा समाजाचे आरक्षण, आण्णासाहेब पाटील महामंडळ, बेरोजगारी याबाबत भूमिका मांडण्याबरोबरचं शहागडाचा ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी सरकारी निधीची मागणीही करु शकतात. तसेच शेती, सेवा, सहकार, कामगार व शिक्षण क्षेत्रातील जनतेला भेडसावणाऱ्या समस्यावर मार्गदर्शन करण्याबरोबरचं नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘हर हर महादेव’ व तयार होत असलेल्या ‘वेडात वीर दौडले सात’ या चित्रपटाबाबत मोठे भाष्य व घोषणा करण्याची शक्यता असल्याचे प्रवीण कानवडे यांनी सांगितले आहे.त्यामुळे या ऐतिहासिक मेळाव्यासाठी शिवप्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रवीण कानवडे, जालिंदर राऊत, दिनकर घुले, दीपक चोरमले, विलास रसाळ, सचिन बालोडे, बाळासाहेब कानवडे, उमेश बैचे, संजय गायकवाड, संजय शिरतार, मारुती सोनवणे, बाबासाहेब गुंजाळ आदिसह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.