नांदेड प्रतिनिधी :
रोटरी क्लब नांदेड व रोटरी क्लब नंदिग्राम यांच्या संयुक्त विद्यमाने डिस्ट्रिक्ट ३१३२ सी.एस. आर. ग्रँड २०२३-२४ अंतर्गत गरजू शाळकरी विद्यार्थिनींना २० सायकलींची वाटप रविवारी (दि. १८) करण्यात आले.
रोटरी च्या माजी प्रांतपाल स्वाती हेरकल यांच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पातून एकूण प्रांत 3132 मध्ये एकूण 1000 सायकली वाटल्या तर नांदेडमधून रोटरी क्लब नांदेड व रोटरी क्लब नंदिग्राम यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शिक्षण घेतांना विविध प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो. शाळेचे अंतर दूर आहे. अशा विद्यार्थिनींना मदत करण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब नांदेड व रोटरी क्लब नंदीग्राम यांनी जिल्हा परिषद शाळा दुगाव (ता. बिलोली), जि. प. शाळा पासदगाव, जि.प.शाळा नांदुसा, जि.प.शाळा कवठा या शाळेतील विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले.
यावेळी दै. प्रजावाणीचे संपादक गोवर्धन बियाणी, प्रमुख पाहुणे किशोर पावडे, मुरलीधर भुतडा यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी गोवर्धन बियाणी यांनी रोटरीच्या सामाजिक कामाचा गौरव केला तसेच विद्यार्थिनींना मन लावून अभ्यास करण्यास प्रेरित केले.
रोटरी क्लब नांदेडचे अध्यक्ष डॉ. संजय पतंगे, सचिव सुरेश अंबुलगेकर, प्रशांत देशमुख, नंदिग्रामच्या अध्यक्षा रेखा गरुडकर, दिपाली पालीवाल, कैलाश काला, उमेश गरुडकर, गोपाल बंग, नितीन भारतीया, नागेश देशमुख, प्रशांत गुर्जर, राजेंद्र दमाम, सिकंदर महंतो, डॉ. शशी गायकवाड, फाळेगावकर, डॉ. शिवराज देशमुख आदींनी यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला. ग्रामीण भागामध्ये मुलींना शाळेमध्ये जाण्यासाठी सार्वजनिक वाहनांची व्यवस्था नसते त्यामुळे त्यांना पायपिट करत शाळेत जावे लागते. त्यासाठी त्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले.