राजेंद्र रास्कर यांच्याकडून आंतरराष्ट्रीय कॉम्रेड मॅरेथॉन यशस्वी
सातारा/अनिल वीर : येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या.विभागात सहाय्यक अभियंता या पदावर कार्यरत असलेले राजेंद्र रास्कर यांनी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या जगातील सर्वात जुन्या आणि 87.5 किलोमीटर पल्याच्या आंतरराष्ट्रीय कॉम्रेड मॅरेथॉन 11 तास 17 मिनिटे 27 सेकंद या वेळेत पूर्ण करून वेगळा नावलौकिक मिळवला आहे.
अतिशय अवघड असणाऱ्या या मॅरेथॉनमध्ये त्यांच्या यशामुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.कॉम्रेड मॅरेथॉनसाठी साताऱ्यातून त्यांच्यासोबत डॉ. सुधीर पवार, यश मुचंडी, विजय भिलारे, अजित निकम, अनिरुद्ध पोतेकर, उदय घोरपडे आणि अल्मास मुलानी हे सात जण सहभागी झाले होते. जगातील सर्वात जुनी आणि अतिशय कठीण समजली जाणारी दक्षिण आफ्रिकेतील ८७. ५ किलोमीटर अंतराची आंतरराष्ट्रीय कॉम्रेड मॅरेथॉनची सुरुवात १९२१ साली झालेली असून, दर्बन ते पीटर्समेरीबर्ग या दोन शहरांमधील पाच मोठे डोंगर आणि जवळपास 25 छोटे मोठे डोंगर पार करून 1800 मीटर पेक्षा जास्त उंचीचा मार्ग आहे. त्यामुळे ही एक जगातील सर्वात जुनी आणि अतिशय कठीण समजली जाणारी टाईम बॉण्ड अल्ट्रा मॅरेथॉन आहे. यंदाचे या मॅरेथॉनचे 97 वे वर्ष होते. जगातील 76 देशातील एकूण 23 हजार धावपट्टू सहभागी झाले होते.यामध्ये 87.5 किलोमीटर चे अंतर वेगवेगळे पाच कट ऑफ गेट वेळेत पास करून 12 तासाच्या आत मॅरेथॉन पूर्ण करणे आवश्यक असते. या स्पर्धेची तयारी गेली वर्षभर सुरू होती. शिव स्पिरिट ग्रुपचे संस्थापक शिव यादव यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 6 महिने त्यांनी कसून सराव केला. तसेच आहारतज्ञ डॉ. देवयानी निकम यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.
राजेंद्र रास्कर यांनी मिळवलेल्या यशाबद्दल महावितरण कंपनीतील अधिकारी, कर्मचारी,सातारा रनर्स फौंडेशन, शिव स्पिरिट ग्रुप, मातोश्री पार्क परिवार, म्हसवे ग्रामपंचायत, सर्व ग्रामस्थ,आमदार यांच्याकडून त्यांचे कौतुक करण्यात आले आहे.जगातील सर्वात कठीण असलेली कॉम्रेड मॅरेथॉन पूर्ण करणे एक स्वप्न होते. त्यासाठी प्रशिक्षक शिव यादव यांचे मार्गदर्शनाखाली गेली सहा महिन्यापासून अहोरात्र मेहनत घेऊन कसून सराव केला.कॉम्रेड मॅरेथॉन पूर्ण करून आपल्या भारत देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. त्यामुळे आनंद होत आहे. तसेच आजपर्यंत घेतलेल्या कष्टाचे चीज झाल्याची भावना राजेंद्र रासकर यांनी व्यक्त केली.