विधानसभेसाठी २० ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी;जिल्हाभरात २५ जून ते २४ जुलैपर्यंत घरोघरी सर्वेक्षण

0

सोलापूर : ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी २५ जून ते २४ जुलैपर्यंत बीएलओ घरोघरी जावून नवीन मतदार नोंदणी, मृत व दुबार मतदारांची नावे वगळण्याची कार्यवाही करणार आहेत. २५ जुलैला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार असून त्यानंतर ९ ऑगस्टपर्यंत मतदारांना विधानसभा निवडणुकीसाठी नाव नोंदणी करता येईल.
२० ऑगस्टला विधानसभा निवडणुकीची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर आता तीन महिन्यांनी विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजणार आहे. ज्या मतदारांकडे मतदान कार्ड असूनही लोकसभा निवडणुकीत मतदान करता आले नाही, ज्यांनी मतदार यादीत नावच नोंदविलेले नाही, ज्यांना पत्ता, नाव यामध्ये दुरुस्ती करायचा आहे, त्यांना ९ ऑगस्टपर्यंत तो बदल करता येणार आहे. तसेच ज्यांना १ जुलै रोजी १८ वर्षे पूर्ण होणार आहेत, त्या नवयुवकांनाही मतदार म्हणून नाव नोंदविण्याची संधी आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. पूर्वी वर्षातून एकदाच जानेवारीत १८ वर्षे पूर्ण होणाऱ्यांना अशी संधी होती, पण आता निवडणूक आयोगाने ही सुविधा १ जानेवारी, १ एप्रिल, १ जून व १ ऑक्टोबर अशा चार टप्प्यात उपलब्ध करून दिली आहे.
मतदार म्हणून ऑनलाइन नाव नोंदविण्याची कार्यपद्धती अगदी सोपी असून त्यासाठी केवळ जन्माचा पुरावा व रहिवासी पुरावा लागतो. विवाहानंतर पत्नीचे नाव नोंदविण्यासाठी सासरचे नाव लागल्याचा पुरावा किंवा विवाह प्रमाणपत्र (ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिकेकडील दाखला) अपलोड केल्यास पत्नीचेही नाव मतदार यादीत दुरुस्तीसह समाविष्ठ होईल.
लोकसभेला ‘मृत’ म्हणून चुकीची नोंद
लोकसभा निवडणुकीपूर्वी मतदारांची नावे वगळण्याची मोहीम घेण्यात आली होती. त्यावेळी कुटुंबातील मृताची माहिती घेत असताना ज्यांनी माहिती दिली किंवा ज्यांची माहिती भरली त्यांचीच अनावधानाने मृत म्हणून नोंद लागल्याचे आता उघड झाले आहे. त्या मतदारांनाही आता नव्याने अर्ज करून मतदार यादीत समाविष्ठ करून घेण्यात येत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने २५ जून ते २४ जुलैपर्यंत बीएलओंच्या माध्यमातून घरोघरी सर्व्हे होणार आहे. त्यात नवीन नोंदणी, नावातील दुरूस्ती, दुबार नावे व मयत नावे वगळण्याची कार्यवाही होईल. २० ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.

गणेश निऱ्हाळी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सोलापूर 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here