लोक पोलच्या निवडणूक एक्झिट पोलचा अंदाज
मुंबई : निवडणुकीशी संबंधित ओपिनियन पोल आणि फोरकास्टर ‘लोक पोल’ या संस्थेनं आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये ताजं सर्वेक्षण केलं आहे.महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत, विरोधी आघाडी महाविकास आघाडी (MVA) भारतीय जनता पक्ष (BJP) नेतृत्वाखालील NDA ला राजकीय पराभव देऊ शकते. लोक पोलच्या निवडणूक सर्वेक्षणातून हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. लोक पोलच्या सर्वेक्षणाच्या निष्कर्षातून समोर आलंय की, महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या महायुतीला 115 ते 128 जागा मिळू शकतात, तर त्यांची मतं 38-41 टक्के असू शकतात.
सर्वेक्षणाच्या निष्कर्षातून असं समोर आलं आहे की, विरोधात असलेल्या महाविकास आघाडीला 141-154 जागा मिळू शकतात, तर त्यांची मतं 41- 44 टक्के असू शकतात. महाराष्ट्रावर झालेल्या लोकनिवडणुकीच्या ग्राउंड सर्व्हेनुसार, इतरांना तेथे पाच ते 18 जागा मिळू शकतात आणि मतांची टक्केवारी 15 – 18 टक्के असू शकते. लोक पोलनं महाराष्ट्रात झोननिहाय (एकूण 6 झोन) केलेल्या सर्वेक्षणाचा निष्कर्ष समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावेळी अतिशय खळबळजनक माहिती समोर आली आहे.
पहिला झोन विदर्भ आहे. इथे 62 विधानसभा निवडणुकीच्या जागा आहेत. तिथे महायुतीला 15 ते 20, महाविकास आघाडीला 40-45 आणि इतरांना एक ते पाच जागा मिळू शकतात, असं समोर आलं आहे. तिथे लोकांचा कौल काँग्रेसच्या बाजूनं झुकल्याचं समोर आलं आहे. अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) मतदारांचे ग्रामीण भागातील समस्यांसह एकत्रीकरण हा एक महत्त्वाचा घटक आहे. सोयाबीन आणि कापसाच्या भावाबाबत तेथील शेतकरी प्रचंड संतापले आहेत.
दुसरा झोन खान्देश असून तिथे राज्यातील विधानसभेच्या 47 जागा आहेत. तिथे सत्ताधारी महायुतीला 20-25, महाविकास आघाडीला 20-25 आणि इतरांना शून्य ते दोन जागा जिंकता येतील. खान्देशातील एसटी पट्टा MVA ला पाठिंबा देत आहे, परंतु उर्वरित प्रदेशात, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं (RSS) मजबूत नेतृत्व आणि उपस्थिती NDA ला मदत करेल. मात्र, कांदा लागवड करणारे शेतकरी सध्याच्या सरकारवर नाराज आहेत. त्यामुळे त्यांचा कौल महाविकास आघाडीला मिळू शकतो.
तिसरा झोन म्हणजे, ठाणे-कोकण. या भागात विधानसभेच्या 39 जागा आहेत. तिथे एनडीएला 25-30 जागा मिळू शकतात, एमव्हीएला पाच ते 10 जागा आणि इतरांना एक ते तीन जागा मिळू शकतात. या भागात महाविकास आघाडीचं नेतृत् फारसं मजबूत दिसत नाही, त्यामुळे कोकण पट्ट्यात एनडीएचा गड आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, शेकाप आणि सीपीआय(एम) च्या प्रभावामुळे देखील एमव्हीए प्रासंगिक बनलं आहे.
चौथा झोन मुंबई आहे. या भागांत विधानसभेच्या 36 जागा आहेत. सत्ताधारी महायुतीला 10 ते 15, महाविकास आघाडीला 20 ते 25 आणि इतरांना शून्य ते एक जागा मिळू शकते. मुंबईत उच्चभ्रू विरुद्ध मध्यमवर्गीय असा निवडणुकीचा मूड असतो. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेकडे मुंबईतील सर्व मराठी मतं पाहायला मिळेल. तर काँग्रेसला मुस्लिम वोटबँकचा फायदा मिळेल. अशातच भारत जोडो न्याय यात्रेचा काँग्रेसला मोठा फायदा झाल्याचंही पाहायला मिळत आहे. असं असलं तरीदेखील मुंबईत मोठा गुजराती वर्ग आहे आणि त्याचा कल भाजपच्या बाजूनं झुकलेला आहे.
पाचवा झोन पश्चिम महाराष्ट्र आहे, ज्यातंर्गत 58 विधानसभेच्या जागा येतात. जिथे एनडीएला 20 ते 25, महाविकास आघाडीला 30 ते 35 आणि इतरांना एक ते पाच जागा मिळण्याची शक्यता आहे. बारामतीमध्ये मात्र शरद पवारांचीच हवा असल्याचं पाहायला मिळत आहे. तर कोल्हापुरात काँग्रेसला फायदा झाल्याचं पाहायला मिळत आहे. शेवटचा आणि सहावा झोन मराठवाडा आहे. जिथे 46 जागा आहेत. एनडीएला 15 ते 20, महाविकास आघाडीला 25 ते 30 आणि इतरांना शून्य ते दोन जागांवर विजय मिळू शकतो. मराठी मतं सध्या जास्तीत जास्त महाविकास आघाडीच्या बाजूनं झुकल्याचं पाहायला मिळत आहे. इथेही शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. जे सध्या सत्तेत असलेल्या महायुती सरकारला फटका देऊ शकतात. (वरील सर्व बाबी सर्वेक्षणातून समोर आलेल्या आहेत. त्या केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून दै. लोकप्रभात आणि प्रेस अलर्ट कोणताही दावा करत नाही.)