माढा : माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेनेच मला निवडून द्यावयाचे ठरवले होते. मी लादलेला उमेदवार नव्हतो हा निवडणुकीतील फरक होता. गडकरी यांनी मंत्री म्हणून कधी राजकारण केले नाही. मात्र, त्यांच्यासारख्या नेत्यांचे नाव चौथ्या यादीत जाहीर झाले.
पण निष्क़्रिय लोकांचे नाव भाजपच्या पहिल्या यादीत आले हे दुर्देव आहे, असा टोला माढा लोकसभा मतदारसंघाचे नवनियुक्त खासदार धैर्यशील मोहिते- पाटील यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव न घेता लगावला.
खा. धैर्यशील मोहिते पाटील यांनी साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेस भवनाला भेट दिली. याप्रसंगी त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून सत्कार करण्यात आला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आ. बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, डॉ. नितीन सावंत, दिलीप बाबर, शहाजी क्षीरसागर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. खा. धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, माझ्या उमेदवारीची जनतेने शरद पवार व जंयत पाटील यांच्याकडे मागणी केली होती. जनतेनेच माझी उमेदवारी ठरवली असून माझा विजय हा जनतेचा विजय आहे.
माढा व सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी शरदश्चंद्र पवार पक्ष वाढविण्याची माझी जबाबदारी वाढली आहे. शरद पवार व जयंत पाटील जी जबाबदारी देतील ती पूर्ण क्षमतेने पार पाडणार आहे. मतदारसंघातील सिंचन व रेल्वेचे प्रश्न मार्गी लावायचे आहेत. माण व फलटणमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. निवडणूक काळात मी मतदारांना दिलेली आश्वासने पूर्ण करणार आहे. फलटण, माण, खटाव, कोरेगाव, सांगोला, माळशिरस, करमाळा, माढा या मतदारसंघांत सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी व नवीन प्रकल्प आणण्यासाठी नागरिकांशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेेऊन शासनाकडे पाठपुरावा करणार आहे.