पाटण : आमदार शंभूराज देसाई यांनी शिवसेना (उबाठा) गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा पाटण न्यायालयात दाखल केला आहे. त्यावर स्थापन झालेले हे सरकार जनमतावर नाही तर ईव्हीएमच्या कृपेवर आले असून, या सरकारने मतांची चोरी केली आहे.
अजितदादा उपमुख्यमंत्रिपदाची दोन दिवसांपूर्वी शपथ घेतात आणि त्यांच्यावर आयकर विभागाची कृपादृष्टी होते. एक हजार कोटींची जप्ती संपून जाते. ही मालमत्ता त्यांना सुपूर्द केली जाते, याचा अर्थ काय काढायचा? असा सवालही अंधारे यांनी उपस्थित केला.
अंधारे यांना पाटण येथील न्यायालयात हजर राहावे लागले. पुणे येथील ड्रग्सप्रकरणी सुषमा अंधारे यांनी उत्पादन शुल्क खात्याचे तत्कालीन मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर आरोप केले होते. या आरोपांच्या अनुषंगाने त्यांना कोर्टात हजर राहावे लागले. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा प्रमुख हर्षद कदम, तालुका प्रमुख सुरेश पाटील उपस्थित होते.
याबाबत पत्रकारांनी त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या, माझा जीवन प्रवास संघर्षाचा आहे. मी असल्या आरोपांना घाबरत नाही. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी माझ्यावर केसेस दाखल आहेत. यामुळे पाटणची केस मला नवीन नाही. दीड वर्षापूर्वी संजय शिरसाट यांच्या वाह्यात वक्तव्यावर मी सर्व पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. पण ती तक्रार नोंदवली गेली नाही, हे आश्चर्य असून साधी नोटीस ही संजय शिरसाट यांना काढली गेली नाही. मात्र, माझ्या विरोधातली पाटणची नोटीस लगेचच काढण्यात आली हे विशेष आहे. असे त्यांनी सांगितले.
त्या म्हणाल्या, पाटण मतदारसंघात सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवाराने जी लढण्याची हिंमत दाखवली ते कौतुकास्पद आहे. या मतदारसंघात दहशत, गुंडागर्दी आणि पैशाचा प्रचंड महापूर असताना एक नवखा युवक हर्षद कदम यांनी दाखवलेली हिंमत ही मोठी गोष्ट आहे.
44 मतदारसंघात फेर मतमोजणी
शिवसेना ठाकरे गटाने 44 मतदारसंघात फेर मतमोजणीसाठी शुल्क भरले आहे. 95 मतदारसंघातील मतांची आकडेवारी पाहता निश्चितपणे १५ ते २० टक्के मतं ही आधीच सेट केलेली दिसत आहेत. त्यावर आम्ही ठाम आहोत. सिनेटच्या निवडणूका बॅलेट पेपरवर झाल्या. त्यात आम्ही दहापैकी दहा जागा जिंकल्या आहेत.