अखेर अंधेरी पोटनिवडणुकीतुन भाजपची माघार : ऋतुजा लटके यांच्या विजयाची आता केवळ औपचारिकता बाकी

0

मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीत अखेर भाजपने माघार घेतली आहे. या निवडणुकीत दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके आणि भाजपचे मुरजी पटेल यांच्यात मुकाबला होणार होता.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी आज अंधेरी पोटनिवडणुकीत भाजप माघार घेत असून पक्षाचे उमेदवार मुरजी पटेल अर्ज मागे घेतील असं त्यांनी जाहीर केले. त्याच प्रमाणे मुरजी पटेल अपक्ष म्हणूनही लढणार नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

विधानसभेची अंधेरी पोटनिवडणुक “निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, असं सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती. आता बिनविरोध झाल्यानं सगळ्यांचे आभार मानते. गेले काही दिवस माझ्यासोबत प्रचारासाठी धावपळ करत होते, त्या सगळ्यांचे आभार. माझे पती रमेश लटके यांचे सर्वपक्षीयांशी सौहार्दपूर्ण संबंध होते. अंधेरीचा विकास हेच माझं ध्येय असेल”, असं ऋतुजा लटके यांनी सांगितलं.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले की भाजपने आपला उमेदवार मागे घेऊन राजकीय प्रगल्भता दाखवियबद्दल त्यांच्या नेत्यांचे अभिनंदन केलेच पाहिजे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी “हे भाजपला उशिरा सुचलेलं शहाणपण आहे”, असे म्हणत टोला लगावला.आहे . दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही भाजपच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले की “या निवडणुकीसंदर्भात जो निर्णय होईल त्याचा परिणाम मुंबई महानगरपालिका निवडणुकीवर होणार होता. या निवडणुकीच्या निमित्ताने जो प्रकार घडला तो सामान्य माणसाला आवडलेला नाही. विजय मिळणार याची खात्री असती तर माघार घेतली नसती”,

याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने प्रतिक्रिया देताना माजी महापौर शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी म्हटले की “महाराष्ट्राची संस्कृती वेगळी आहे. दिवंगत व्यक्ती जाते, घरातलं कुणी उभं राहतं तेव्हा आम्ही उमेदवारी देत नाही. भाजपने आडमुठेपणा केला. लटके मॅडमचा राजीनामा अडकवण्यात आला. त्यावेळी ज्या पद्धतीने त्रास देण्यात आला ते आम्ही पाहिलं. भाजपने मनावर दगड ठेऊन हा निर्णय घेतला आहे. मुरजी पटेल यांनी महानगरपालिकेत खोटं जात प्रमाणपत्र दिल्याने वाद निर्माण झाला होता. उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. हे सगळं आधी करता आलं असतं. घमासान झालं नसतं. लटके मॅडमना, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना जो मानसिक त्रास झाला त्याचं काय करणार”?
एकनाथ शिंदे गटाच्या बंडानंतर ही निवडणूक म्हणजे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील थेट लढत मानली जात होती. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने या निवडणुकीचं महत्त्व वाढलं आहे.
दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्याविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह बाकी पक्षांनी उमेदवार दिलेला नाही.

आज सकाळीच भाजपचे राष्ट्रीय सचिव सी. टी. रवी मुंबईत दाखल झाले होते . याबाबत पक्षाची बैठक घेऊन अंधेरी पूर्व येथून उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय यावेळी घेणयात आला. या बैठकीला मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, भाजपा प्रभारी सी टी रवी यासोबतच मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार गोपाळ शेट्टी,अतुल भातखळकर, चित्रा वाघ, कृपाशंकर सिंह, अमित साटम, मुंबईतील आमदार उपस्थित होते. .
पक्षाचा आदेश सर आँखोंपर : मुरजी पटेल
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना भाजपचे अंधेरीचे उमेदवार मुरजी पटेल म्हणाले की भाजपमध्ये पक्षाचा आदेश सर्वोच्च आहे, त्यामुळे पक्षाच्या आदेशाप्रमाणे आपण आपली उमेदवारी मागे घेत असून . आपण नाराज नाही . यापुढेही आपण वरिष्ठ नेत्यांच्या नेतृत्वाखाली काम करीत राहणार आहोत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here