आयुर्वेद कुंभातून आरोग्याचा अमृत ज्ञानाचा सागर…*

0

*आयुर्वेद पर्व -२०२२ | आयुर्वेद सम्मेलनाचा महत्वपूर्ण टप्पा संपन्न…*

  भारत सरकारच्या आयुष मंत्रालय आणि महाराष्ट्र आयुर्वेद सम्मेलन यांचे वतीने श्री साईबाबांच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या शिर्डी पासून श्री क्षेत्र कोकमठाण(ता.कोपरगांव)च्या पावन भूमीत विश्वात्मक जंगली महाराज आश्रमातील आत्मा मालिक ध्यानपीठ येथे दि.२३,२४ आणि २५ सप्टेंबर २०२२ या कालावधीत अखिल भारतीय आयुर्वेद महासम्मेलन संपन्न झाले.

        आयुर्वेद पर्व २०२२ चे आयोजन प्रमुख आणि राष्ट्रीय आयुर्वेद गुरु डॉ.रामदास आव्हाड यांनी हे शिवधनुष्य लीलया पेलले.आयुर्वेद सम्मेलन यशस्वितेसाठी पडद्यावरील आणि पडद्याच्या मागे असलेल्यांची साथ-सोबत-संगत महत्वपूर्ण ठरली.महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागात प्रथमच आयोजित केलेले राष्ट्रीय स्तरावरील आयुर्वेद सम्मेलन सर्वोत्तम आणि यशस्वी झाले.

          “आयु आणि वेद” या शब्दांचा एकत्र संगम म्हणजे “आयुर्वेद” होय. काही लोक आयु आणि विज्ञान असेही संबोधतात.थोडक्यात सांगायचे तर कुठल्याही मनुष्याला निरोगी आणि दिर्घायुष्य जगण्याची पध्दती आयुर्वेदात आहे.भारतीय परंपरेसह अनेक विदेशी प्राचिन ग्रंथ चाळले तर देव-देवतांच्या काळात “आयुर्वेद” पध्दती असल्याचे आढळते.”धन्वंतरी” ही आरोग्यची देवता मानली जाते.ऋग्वेदातही आयुर्वेदाचे महत्त्व वाचावयास मिळते.हजोरो वर्षांपुर्वी ऋषी-मुनींच्या जीवनशैलीचा अभ्यास केला तर आयुर्वेदातील जीवनशैली आणि उपचार पद्धतीचे संशोधन आढळतात.कोल्हापूर जवळ काडसिध्देश्वर महास्वामी यांचा कन्हेरी मठ प्रसिद्ध आहे.या ठिकाणी हजारो वर्षांपूर्वीचे ऋषीमुनींचे संकल्पित शिल्प आणि त्यांनी लावलेले शोधाची माहितीचे यथार्थ दर्शन महागुहेत पहावयास मिळते.

             महान आणि उपचारात मनुष्यावर सहसा कुठलेही दुष्परिणाम जाणवू नदेणा-या आयुर्वेदला स्वातंत्र्यानंतर आरोग्य विभागाचा एक भाग म्हणून स्थान होते.भारतातील प्रख्यात वैद्य,आयुर्वेद प्रेमी यांची स्वतंत्र आयुष मंत्रालय सुरु करण्याची मागणी होती.तसेच केनियाच्या माजी पंतप्रधान यांची मुलगी रोज मेरी ओडिंगा केरळच्या आयुर्वेद नेत्र चिकित्सालयात तीची गेलेली दृष्टी परत मिळाली.केनीयाच्या माजी पंतप्रधान यांनी आपला अनुभव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना विषद केला. या बाबींची दखल घेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय स्तरावर आयुष मंत्रालयाची स्वतंत्र निर्मिती केली आहे.जागतिक आरोग्य संघटनाही आयुर्वेदाची पुरस्कर्ती होवू पहाते आहे.जवळपास ५६ देशात आयुर्वेद पहावयास मिळते.

          गोदातीरावर प्रभू श्रीरामचंद्राने सितेला कुंकू लावले अशा कुंकुमस्थान(कोकमठाण)च्या पावन भूमीत भारताच्या विविध राज्यांतील आयुर्वेदातील वैद्य साधूंचा कुंभ आयोजित झाला.या कुंभातून ओसंडून वाहिलेले अमृत ज्ञानसागराने नवोदित वैद्य चिंब भिजून निघाले.सुमारे २ हजार वैद्य भारताच्या कानाकोपऱ्यातून आले होते.भविष्यात देश-विदेशात आयुर्वेदाचा प्रचार-प्रसार या वैद्यांच्या माध्यमातून अधिक गतीमान होणार असल्याचे प्रतिबिंब या आयुर्वेद पर्वात पहावयास मिळाले.

          आत्मा मालिका संकुलाचे प्रवेशव्दारासमोर “धन्वंतरी” देवतेच्या मुर्तीची पुजा आणि यज्ञ करण्यात आले होते.आत्मा मालिक ध्यानपीठचे प.पू.गुरुदेव जंगलीदास माऊली यांचे प्रमुख उपस्थितीत आणि संत परमानंद महाराज यांचे स्वागत संबोधनानाने आयुर्वेद पर्वांचा शुभारंभ करण्यात आला.

         आयुर्वेद पर्व ठिकाणी पंचकर्म महर्षी वैद्य कै.प्र.ता.जोशी(नाना) रुग्ण चिकित्सा मोफत शिबीर दालन, वैद्य कै.यादवजी त्रिकमजी आचार्य वन औषधी प्रदर्शन, पद्मविभूषण वैद्य कै.बृहस्पतीदेव त्रिगुणा स्टाॅल‌ प्रदर्शन,पद्मभूषण वैद्य कै.श्रीराम शर्मा आयुष स्टाॅल,वैद्य कै.आ.वा.दातारशास्री औषधी वितरण कक्ष उभारण्यात आले होते.

         भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीने आयुर्वेदासाठी उपयुक्त दूर्मिळ वनस्पती, आयुर्वेदाची माहितीचे दर्शन घडविणारे सचित्र फलक,आयुर्वेदात योगदान देणाऱ्या वैद्याची माहिती, तसेच डिवाईन,सांडू,झेंडू,डाबर, वैद्यनाथ,ए.बी.या सह अनेक नामांकित कंपन्यांचे ५७ स्टाॅल या पर्वात सहभागी झाले होते.आयुर्वेद,युनानी,होमिओपॅथी आणि सिध्द या पध्दतीने उपचार देणारे वैद्यही उपस्थित होते.

        सर्व नागरिकांसाठी मोफत आयोजन करण्यात आलेल्या आयुर्वेद पर्वात नागरिकांची मोफत तपासणी केंद्र उभारण्यात आले होते.यात नामांकित वैद्य यांनी सेवा देत तीन दिवसांत सुमारे २८०० नागरिकांची मोफत तपासणी ३५० नागरिकांचे मोफत पंचकर्म करण्यात आले.

         आयुर्वेद संमेलनात नवोदित वैद्यांसमोर पहिल्या दिवशी “आयुर्वेद आहार स्वास्थ का आधार” या विषयावर वैद्य राकेश शर्मा, “प्रकृती के मूल सिध्दांतो के साथ व्यक्तीगत धारणा के रुप में आहार” या विषयावर वैद्य साक्षी शर्मा, “दोष धातू,मल के नियमन के लिए आहार” या विषयावर वैद्य तपनकुमार वैद्य यांची व्याख्याने झाली.

         संमेलनाच्या दूस-या दिवशी “भारत में माता मृत्यू दर को कम करने में गर्भिणी हेतू मासानुमासिक आहार की भूमिका” या विषयावर डॉ.के.भारती, “आयुर्वेद आहार” या विषयावर वैद्य अनुपम श्रीवास्तव, “आयुर्वेद का ट्रिपल ॲन्टीजन” या विषयावर वैद्य प्रविण जोशी, आयुर्वेदानुसार आहार निर्माण प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. “ध्यान से आत्मा की पहचान” या विषयावर स्वामी परमानंद महाराज, “प्रमेह-आयुर्वेद चिकित्सा, पंचकर्म तथा आहार” या विषयावर वैद्य ऋषिकेश म्हात्रे,यांचे व्याख्यान झाले.तर अध्यापक विशेष संवादात वैद्य तनुजा नेसरी, वैद्य नीरजा शर्मा, वैद्य बी.टी.शिंदे यांनी अध्यापक विशेष संवाद सत्रात सहभाग घेतला.”छत्रपती शिवाजी महाराज आणि आयुर्वेद” या विषयावर शिवचरित्र व्याख्याते वैद्य शिवरत्न शेटे यांचे विशेष व्याख्यान झाले.

           संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी शासकीय आयुर्वेद महाविद्यालय,त्रिवेंद्रम(केरळ) प्रोफेसर वैद्य एस.गोपाकुमार यांचे व्याख्यानाने सूरुवात झाली.आयुर्वेद प्रॅक्टिस क्यों महत्वपूर्ण है? या विषयावर राष्ट्रीय आयुर्वेद गुरु वैद्य रामदास आव्हाड यांचे विशेष व्याख्यान झाले. समारोप सत्रात भारत सरकार आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेजा,सांडू फार्मास्युटिकलचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशांक सांडू यांची प्रमुख उपस्थिती होती.तसेच अखिल भारतीय आयुर्वेद संमेलनाचे अध्यक्ष वैद्य राकेश शर्मा, श्री.धुतपातेश्वर प्रा.लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित पुराणिक,डाबर प्रा.लि.चे सरव्यवस्थापक वैद्य दुर्गाप्रसाद वेलदिंडी यांचे चर्चा सत्राने आयुर्वेद सम्मेलनाचा समारोप झाला.     

        आयुर्वेद संमेलनात आत्मा मालिक येथे राष्ट्रीय आयुर्वेद गुरु डॉ.रामदास आव्हाड यांना स्वतंत्र कक्ष देण्याचा निर्णय जाहीर केला.आत्मा मालिक संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी आणि त्यांचे सहकारी यांची साथ सम्मेलन यशस्वी करण्यात महत्वपूर्ण राहिली.तसेच पद्मभूषण,पद्मश्री वैद्य राज त्रिगुणा,वैद्य शशीताई आहेर, वैद्य अनिल दुबे, वैद्य छोटेलाल यादव,वैद्य शरद ठुबे, वैद्य सतिष भट्टड, वैद्य कौस्तुभ भोईर, वैद्य वैभव गवळी यांचे सह असंख्य वैद्य आणि आयुर्वेदावर प्रेम करणारे सम्मेलन यशस्वितेचे शिल्पकार ठरले.

           काही दशकांपूर्वी वैद्य(डॉक्टर), वकील, अधिकारी यांचे विषयी जनमानसात आदराची भावना दृढ होती.वैद्याला उपचारासाठी घरी बोलावले तर त्या कुटुंबातील समाजात प्रतिष्ठा असलेली मंडळी सुध्दा वैद्यांची औषधांची पिशवी स्वतः उचलून आदराने घरात बोलवत.बदलती जीवनशैलीने हे सारे मोडीत काढले.परंतू आयुर्वेद पर्वात येणारे नवोदित वैद्य हे ज्येष्ठ वैद्यांना चरणस्पर्श करीत आदर भावाने नतमस्तक होतांना पाहून समाधान वाटले.आलेला प्रत्येक नवोदित वैद्य अत्यंत आत्मियतेने आयुर्वेद ज्ञान गुरुवाणीतून जाणून घेत होता.

           आयुर्वेद सम्मेलनात गुरु शिष्य यांच्या संवादातून प्रकट होणारी सभ्यता, विनम्रता आणि आदरभाव जाणवत होता.आयुर्वेदातील वैद्य आणि रुग्णांचे हे अंतर भविष्यात नागरिकांसाठी स्नेहभावाने आरोग्य सेवा देणारे असेल अशी अपेक्षा वाटते.प्राचिन कालखंडात आयुर्वेद ज्ञानाचा महासागर असलेला भारत आगामी काळात आयुर्वेदाच्या महाकुंभ ठरेल अशी अपेक्षा आहे.

          आत्मा मालिक केंद्रावर संपन्न झालेल्या आयुर्वेद पर्वाचा दूसरा टप्पा येत्या डिसेंबर मध्ये “कुरुक्षेत्र” येथे होत आहे.मनुष्याला दिर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी अनेक वेगवेगळ्या उपचार पद्धती जगभरात आहे.यात आयुर्वेदातील जुणे-नवे वैद्य यांचे पुढे प्रत्येक सिध्दांत, संशोधन यावर जिद्द,चिकाटी आणि मेहनतीने टिकण्यासाठी जगभरातील तज्ञांचे मोठे आव्हान आहे. कुरुक्षेत्रावरील रणभूमीवर होणा-या आयुर्वेद संमेलनात सर्व वैद्यांना सज्ज राहून पुन्हा आयुर्वेद सिध्द होवून सांगावे लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here