इंग्लंडच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं ९६ व्या वर्षी निधन !

0

लंडन : इंग्लंडच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं ९६ व्या वर्षी निधन ! महाराणी एलिझाबेथ द्वितीय, सर्वाधिक काळ राजगादीवर राहिलेल्या युकेच्या महाराणी यांचं वयाच्या 96 व्या वर्षी बालमोरल कॅसलमध्ये निधन झालं. त्यांनी 70 वर्षं राज्य केलं.
गुरुवारी (8 सप्टेंबर) महाराणी एलिझाबेथ यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांचे सर्व कुटुंबीय स्कॉटलंडमधल्या त्यांच्या बालमोरल कॅसलमध्ये जमले होते.

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचा जीवनप्रवास
1952 मध्ये महाराणी एलिझाबेथ यांनी पदभार स्वीकारला होता. त्यांच्या निधनानंतर आता त्यांचे सर्वांत मोठे पुत्र चार्ल्स जे माजी प्रिंस ऑफ वेल्स आहेत यूकेचे पुढचे राजे होतील. जे यूकेबरोबरच 14 कॉमनवेल्थ देशांचे प्रमुख असतील.

नवे महाराज म्हणाले, “एका लोकाभिमुख महाराणीच्या आणि प्रेमळ मातेच्या निधनाने आम्ही सगळेच व्यथित झालो आहोत. मला माहितेय की त्यांच्या जाण्याने पूर्ण देशाला, साम्राज्याला आणि कॉमनवेल्थला दुःख होणार आहे. जगभरातल्या असंख्य लोकांचं हे दुःख आहे.”

बकिंगहॅम पॅलेसकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, महाराणी एलिझाबेथ यांनी ब्रिटिश वेळेनुसार दुपारी देह ठेवला.

नवे महाराज चार्ल्स आणि क्वीन काँसोर्ट कमिला आज बालमोरल कॅसलमध्येच राहणार आहेत. उद्या हे लंडनमध्ये परततील, असं सांगण्यात आलं आहे.

महाराणी एलिझाबेथ यांचे नातू प्रिंस विल्यम सध्या बालमोरल मध्येच आहेत. तर प्रिंस हॅरी लवकरच तिथं दाखल होणार आहेत.

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचा मुलगा आणि नवे महाराजा चार्ल्स त्यांच्या आईच्या निधनावर शोक व्यक्त करताना म्हणाले की महाराणींचं निधन हा त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आंत्यातिक दु:खाचा क्षण आहे. त्यांची उणीव जगभर भासेल.

ते म्हणाले, “अत्यंत प्रेमळ आई आणि महाराणीच्या जाण्याने आम्ही शोकाकूल आहोत. त्यांची उणीव देशभर, राष्ट्रकुलात आणि जगभरातील लोकांना भासेल.”

महाराजा चार्ल्स आणि त्यांची पत्नी कॅमिला (आता महाराणी) शुक्रवारी लंडनला परततील असं बकिंगहॅम पॅलेसतर्फे सांगण्यात आलं आहे.
किंग चार्ल्स आता महाराजा झाले आते. ते राष्ट्रकुलातील 14 देशांचं नेतृत्व करतील.
ते, त्यांची पत्नी कॅमिला बारमोल येथे त्यांच्या भावंडांसकट आहेत. राजघराण्याचा दुखवटा पाळण्यास सुरुवात केली आहे. सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. युकेमधील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी त्यांच्या आठवणींना देखील उजाळा दिला आहे.

“2015 आणि 2018 सालच्या युके दौऱ्यादरम्यानच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यासोबतच्या भेटी माझ्यासाठी संस्मणीय होत्या. त्यांची आपुलकी आणि दयाळूपणा मी कधीही विसरणार नाही. यातील एका भेटीदरम्यान त्यांनी मला गांधीजींनी त्यांना लग्नानिमित्त भेट दिलेला रुमाल दाखवला होता. ही गोष्ट कायम माझ्या स्मरणात राहील,‌” असं नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केलं आहे.
यूकेच्या पंतप्रधान लिझ ट्रझ यांची नेमणूक महाराणी एलिझाबेथ यांनी नुकतीच, 6 सप्टेंबरला केली होती.

त्यांनी म्हटलं की, “महाराणी एलिझाबेथ एक असा पाया होत्या ज्यांच्या आधाराने आधुनिक ब्रिटनची पायाभरणी झाली. त्यांनी आम्हाला स्थैर्य आणि ताकद दिली.”

नव्या महाराजांविषयी बोलताना त्या म्हणाल्या, “जशी त्यांच्या आईंना आम्ही आमची निष्ठा आणि भक्ती दीर्घकाळासाठी समर्पित केली होती तसंच आम्ही नव्या महाराजांनाही निष्ठा समर्पित करू.”

“दुसरा एलिझाबेथियन कालखंड संपला आहे, आपण आता आपल्या या महान देशाच्या प्रदीर्घ इतिहासाच्या एका नव्या कालखंडात शिरत आहोत. महाराणींची इच्छा असणारे शब्द मी उच्चारतेय, देव राजाचं भलं करो.”

हा आमच्या देशासाठी सर्वाधिक दु:खाचा दिवस असल्याचं यूकेचे माजी पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी म्हटलं आहे.

‘आम्ही श्रद्धांजली वाहण्यासाठी आलो आहोत’
रात्रीच्या सुमारास बकिंगहॅम पॅलेसमध्ये गर्दी व्हायला लागली आहे. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी लोक इथं जमले आहेत.

यापैकी एक आहेत डेबी थॉमस. त्या म्हणाल्या, “माझ्या मुलाने आम्हाला फोन केला आणि सांगितलं की राणी मरण पावली. आम्हाला धक्का बसला आहे आणि आम्हाला श्रद्धांजली वाहण्यासाठी थेट येथे आलो आहे.”

“महाराणी गेल्या 70 वर्षांपासूनची एक महान सम्राट आहे. माझा खरोखर तिच्या निधनाच्या बातमीवर यावर विश्वास बसत नाही,” असंही त्या म्हणाल्या.

बकिंगहॅम पॅलेसच्या दर्शनी भागावर दिवे चमकत असताना टाळ्या आणि जल्लोष सुरू झाला.
लंडनमधल्या बकिंगहॅम पॅलेसच्या बाहेर महाराणींच्या प्रकृतीची खबरबात घ्यायला नागरिक जमले होते.राणी एलिझाबेथ यांच्या निधनाची वार्त समजताच ते रडायला लागले. पॅलेसवर फडकणारा यूनियन जॅक हा झेंडा ब्रिटिश वेळेनुसार संध्याकाळी साडेसहा वाजता अर्ध्यावर उतरवण्यात आला.

कॅबवाल्यांकडूनही आदरांजली
बकिंगहॅम पॅलेसला जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर जवळपास 50 कॅब उभ्या करण्यात आल्या आहेत. अशाप्रकारे कॅब चालकांनी राणी एलिझाबेथ द्वितीय यांना आदरांजली वाहिली आहे.

राणींच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर अनेकांनी त्यांची कॅब पार्क करून दिली आहे.

“आमची राणी असल्यामुळेच आम्ही होतो,” असं मायकल अकरमन या कॅब चालकानं म्हटलं आहे.

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचा राणी म्हणून कालखंड फार मोठा आहे, दुसरं महायुद्ध संपल्यानंतरचं जग, ब्रिटीश साम्राज्य ते कॉमनवेल्थ (ब्रिटिश साम्राज्याच्या अधिपत्याखालून स्वतंत्र झालेली राष्ट्र) असा बदल, शीतयुद्ध संपल्यानंतरचं जग आणि यूकेचा यूरोपियन युनियनमध्ये प्रवेश तसंच त्यातून बाहेर पडणं हे सगळं महाराणींच्या कालखंडात झालं.

त्यांच्या राज्यात ब्रिटनचे 15 पंतप्रधान होऊन गेले. विस्टन चर्चिल, ज्यांचा जन्म 1874 मध्ये झाला होता, त्यांच्यापासून, ते त्यांच्यानंतर 101 वर्षांनी, 1975 साली जन्मलेल्या लिझ ट्रस यांच्यापर्यंत. लिझ ट्रस यांची नेमणूक मागच्याच आठवड्यात राणी एलिझाबेथ यांनी केली होती.

राणी त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात दर आठवड्याला यूकेच्या पंतप्रधानांशी चर्चा करायच्या.

राणींचं संपूर्ण नाव होतं एलिझाबेथ अलेक्झांड्रा मेरी विंडसर. त्यांचा जन्म लंडनमधल्या मेफेयरमध्ये 21 एप्रिल 1926 साली झाला. त्यांचा जन्म झाला तेव्हा त्या राणी होतील असं कोणालाही वाटलं नव्हतं.

पण डिसेंबर 1936 मध्ये त्यांचे मोठे काका एडवर्ड सहावे यांनी दोनदा घटस्फोट झालेल्या वॉलीस सिम्पसन यांच्याशी लग्न करण्यासाठी राजवस्त्रांचा त्याग केला.

यानंतर एलिझाबेथ यांचे वडील जॉर्ज (सहावे) राजा बनले. लहानपणी लिलिबेट या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या एलिझाबेथ वयाच्या 10 वर्षी राज्याच्या उत्तराधिकारी बनल्या.

यानंतर तीनच वर्षांत ब्रिटनने नाझी जर्मनीच्या विरोधात युद्ध पुकारलं. एलिझाबेथ आणि त्यांच्या लहान भगिनी प्रिन्सेस मार्गारेट यांनी युद्धकाळातला बराचसा वेळ विंडसर कॅसलमध्ये घालवला. त्यांच्या पालकांनी सुरक्षेच्या कारणास्तव कॅनडात जाऊन राहाण्यासाठी नकार दिला.

आपल्या वयाची 18 वर्षं पूर्ण झाल्यानंतर एलिथाबेथ ऑझिलरी टेरिटोरियल सर्व्हिसमध्ये दाखल झाल्या आणि तिथे पाच महिन्याच्या कालावधीत त्यांनी प्राथमिक मोटार मेकॅनिक बनण्याचं प्रशिक्षण घेतलं तसंच त्या ड्रायव्हिंगही शिकल्या.

अनेक वर्षांनी याची आठवण काढताना त्या म्हणाल्या होत्या, “प्रतिकूल परिस्थितीत काम करण्याचं बळ काय असतं, ते स्पिरीट कसं आपल्यात स्फुल्लिंग चेतवतं हे मला तिथे कळलं.”
संपूर्ण युद्धकाळात त्यांनी त्यांचे लांबचे नातेवाईक असलेल्या ग्रीसचे प्रिन्स फिलिप यांच्याशी पत्रव्यवहार केला. प्रिन्स फिलिप रॉयल नेव्हीमध्ये कार्यरत होते. याच काळात त्यांचं प्रेम फुललं आणि वेस्टमिस्टर अॅबे इथे 20 नोव्हेंबर 1947 साली त्यांचं लग्न झालं. यानंतर प्रिन्स फिलीप यांना ड्यूक ऑफ एडिंबरा ही पदवी मिळाली.

त्यांचं लग्न 74 वर्षं टिकलं. 2021 साली प्रिन्स फिलिप यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांचं वय 99 वर्षांचं होतं. त्यांच्या मृत्यूच्या आधी राणी एलिझाबेथ यांनी प्रिन्स फिलीप यांचं वर्णन करताना म्हटलं होतं की “आमच्या 74 वर्षांच्या लग्नात ते माझी ताकद आणि पुढे जाण्याची जिद्द बनले होते.”

या दांपत्याचं पहिलं अपत्य, प्रिन्स चार्ल्स यांचा जन्म 1948 साली झाला. त्यानंतर दोनच वर्षांनी प्रिन्सेस अॅन यांचा जन्म झाला. 1960 साली या दांपत्यांचं तिसरं अपत्य प्रिन्स अँड्र्यू तर 1964 साली चौथं अपत्य प्रिन्स एडवर्ड यांचा जन्म झाला.

महाराणी एलिझेबेथ आणि प्रिन्स फिलिप यांना आपल्या चार मुलांकडून आठ नातवंड आहेत तर 12 पतवंड आहेत.

प्रिन्सेस एलिझाबेथ 1952 साली केनियात होत्या. त्यांच्या वडिलांची, किंग जॉर्ज यांची तब्येत ठीक नव्हती. तेव्हा प्रिन्स फिलिप यांनी एलिझाबेथ यांना सांगितलं की त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. त्या तातडीने लंडनला परत आल्या आणि पुढची महाराणी बनल्या.

याची आठवण काढताना नंतर त्या म्हणाल्या होत्या, “ते फार अचानक घडलं. ते असं होतं की जी जबाबदारी तुमच्यावर सोपवली गेलीये ती परिपूर्ण पद्धतीने पार पाडणं.”

वेस्टमिन्स्टर अॅबी येथे 2 जून 1953 साली त्यांचा राज्याभिषेक झाला. त्यावेळी त्यांचं वय 27 वर्षांचं होतं. त्यांचा राज्यभिषेक टीव्हीवर दाखवला गेला होता आणि त्यावेळी तो 2 कोटींहून अधिक लोकांनी पाहिला असा अंदाज आहे.

त्यानंतर येणाऱ्या दशकांमध्ये मोठे बदल घडत होते. जगभरातलं ब्रिटिश साम्राज्य लयाला जात होतं तर 60 च्या दशकातली सामाजिक मुल्यं लोकांच्या खाजगी आयुष्याव प्रभाव टाकत होती.

एलिझाबेथ यांनी ब्रिटनमधल्या राजसत्तेचा चेहरामोहरा बदलला. पूर्वीच्या राजेरजवाड्यांसारख्या त्या सर्वसामान्य जनतेपासून वेगळ्या राहायच्या नाहीत.

लोकांमध्ये जाऊन मिसळायच्या, शाही भेटी द्यायच्या, आणि सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावायच्या.

राष्ट्रकुल देशांसाठीही त्या वचनबद्ध होत्या. त्यांनी राष्ट्रकुल देशांमधल्या प्रत्येक देशाला एकदा तरी भेट दिली होती.

पण तरी त्यांच्या खाजगी आणि सार्वजनिक आयुष्यात अडचणी आल्या, दुःख आली. 1992 साली त्यांचं राहातं घर असलेल्या विंडसर कॅसलला आग लागली. त्यांचं कामही इथूनच चालायचं. त्यांच्या तीन मुलांची लग्न मोडली, त्यांना हेही सहन करावं लागलं.

प्रिन्सेस ऑफ वेल्स डायना यांचा 1997 साली कार अपघातात मृत्यू झाल्यानंतरही सार्वजनिकरित्या प्रतिक्रिया देण्यात टाळाटाळ केल्याबद्दल त्यांच्यावर खूप टीका झाली.

आधुनिक समाजात राजेशाहीला स्थान का असावं अशा आशयाचे अनेक प्रश्नही विचारले गेले. त्यावरून त्यांनी हे खुलेपणाने मान्य केलं की, “कोणतीही संस्थात्मक प्रणाली तिच्यावर विश्वास ठेवणाऱ्या आणि प्रेम करण्याऱ्या लोकांची टीका आणि समीक्षा नाकारू शकत नाही. आणि जे लोक त्या संस्थात्मक प्रणालीवर विश्वास ठेवत नाही, त्यांच्या टीकेकडे दुर्लक्ष करूच शकत नाही.”

महाराणी एलिझाबेथ व्दितीय 21 वर्षांच्या असताना त्यांनी शपथ घेतली होती की देशाच्या सेवेसाठी आयुष्य समर्पित करेन. त्यांच्या राज्याभिषेकाला 25 वर्षं पूर्ण झाल्यानंतर, 1977 साली दिलेल्या एका मुलाखतीत त्या म्हणाल्या, “भले मी ती शपथ घेतली तेव्हा अगदी कोवळी होते, भल्याबुऱ्याची समज नव्हती. पण आजही मला त्याबद्दल कोणतीही तक्रार नाही, की त्यातला एकही शब्द मी मागे घेऊ इच्छित नाही.”

या मुलाखतीनंतर 45 वर्षांनी, जेव्हा त्यांच्या राज्याभिषेकाला 75 वर्षं पूर्ण झाल्याच्या आनंदात यूकेत सोहळे साजरे होत होते, तेव्हाही त्यांनी पत्र लिहून याच शपथेचा पुनरूच्चार केला.

याच वर्षी जून महिन्यात हा कार्यक्रम झाला. पण त्या या कार्यक्रमातले सगळ्या सोहळ्यांना त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत कारण त्यांची तब्येत ठीक नव्हती.

कार्यक्रमाच्या समारोपात त्यांनी राजवाड्यासमोर जमलेल्या प्रचंड गर्दीला अभिवादन केलं. तेव्हा त्यांच्या पुढच्या तीन पिढ्या तिथे उपस्थित होत्या. लोकांनी जल्लोष केला.

यूकेत आता राष्ट्रीय दुखवटा आहे. सगळे सरकारी कार्यक्रम रद्द केले गेले आहेत आणि यूकेचा झेंडा यूनियन जॅक अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यूकेच्या महाराणी एलिझाबेथ व्दितीय यांच्या निधनानंतर भारतात 11 सप्टेंबर 2022 ला राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असून, या दिवशी कोणतेही सरकारी कार्यक्रम होणार नाहीत. तसंच सगळ्या सरकारी इमारतींवर फडकत असलेला तिरंगा दिवसभरासाठी अर्ध्यावर उतरवण्यात येईल.

महाराणी एलिझाबेथ यांच्यावर येत्या दोन आठवड्यात अंतिम संस्कार होतील अशी चिन्हं आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here