औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचं स्टेटस ठेवल्याचा कारणावरून कोल्हापुरात तणाव

0

कोल्हापुर : औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचं कथितरित्या उदात्तीकरण करणारे स्टेटस ठेवल्याच्या आरोपावरून कोल्हापुरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

मंगळवार (6 जून) सायंकाळपासून या प्रकरणावरून कोल्हापुरात तेढ निर्माण झालेला असून काही ठिकाणी तोडफोडीच्या घटना घडल्या.

काही संघटनांनी यावरून कोल्हापूर बंदचीही हाक दिली. यादरम्यान हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं.

त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठी चार्ज केला. तसंच, अश्रुधूराच्या नळकांड्याही काही ठिकाणी फोडण्यात आल्या.

या प्रकरणात पोलिसांनी स्टेटस ठेवल्याच्या आरोपांवरून 6 जणांना अटक केली आहे.

“कोल्हापुरात सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे, कोणीही कायदा सुव्यवस्था खराब होईल असे करू नये, कोणीही कायदा हातात घेऊ नये, कायदा हातात घेतल्यावर कारवाई होणार. कायदा हातात घेण्याचं समर्थन केलं जाणार नाही. औरंगजेबाचं उदात्तीकरण कोणीही करू नये”, असं महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे.

दरम्यान, इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय कोल्हापूर प्रशासनाकडून घेण्यात आला असून त्यादृष्टीने कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. सध्या कोल्हापूर शहरातील परिस्थिती नियंत्रणात येत आहे, अशी माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. सद्यस्थितीत कोल्हापुरात तणावपूर्ण शांतता आहे.

मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन सोहळा कोल्हापुरात साजरा करण्यात आला.

याच दिवशी शहरातल्या तिघा संशयितांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचं कथितरित्या उदात्तीकरण करणारे स्टेटस ठेवले.

या स्टेटसवर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतला. काही वेळात हे स्टेटस संपूर्ण शहरात व्हायरल झाले.

यानंतर, सायंकाळच्या सुमारास शहरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यासमोर हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते हे एकत्रित येऊ लागले.

व्हॉट्सअप स्टेटस ठेवणाऱ्या तरुणांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी संबंधित कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होती.

दरम्यान, पोलिसांनी तत्काळ कारवाई करावी, असं म्हणत आक्रमक झालेल्या जमावाने स्टेटस ठेवणाऱ्या तरुणांच्या निवासस्थानी धाव घेतली. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून जमावाला पुन्हा पोलीस ठाण्याकडे आणलं. दरम्यान, काही कार्यकर्त्यांनी परिसरातील वाहनांची तोडफोड करत दगडफेकीचा प्रयत्न केला. त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. तर काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here