चोरट्यांकडे ‘मास्टर की’! सोलापुरातून साडेनऊ महिन्यांत १५७ दुचाकींची चोरी

0

सोलापूर : शहरात घरफोडीसोबतच दुचाकींची चोरी वाढली आहे. लाखो रुपयांचे घर, घरात लाखोंच्या मौल्यवान वस्तू असतात; तरीही बहुतेक घरांसमोर सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. दुसरीकडे ६० ते ९० हजारांची दुचाकी घेतल्यानंतर त्याला चारशे-पाचशे रुपयांचे वेगळे (यू-पिन) लॉक लावले जात नाही.
              त्यामुळे चोरट्यांचा डाव सहजपणे यशस्वी होत असून, मागील साडेनऊ महिन्यांत सोलापूर शहरातून तब्बल १५७ दुचाकींची चोरी झाली आहे. बहुतेक दुचाकींच्या चोरीसाठी चोरट्यांनी एकच ‘मास्टर की’ वापरली, हे विशेष.

शहरात सात पोलिस ठाणी आहेत. त्यात एमआयडीसी, जोडभावी, जेलरोड, फौजदार चावडी, सदर बझार व विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरी लक्षणीय आहे. रविवारी (ता. ९) पोलिस आयुक्तालयाकडील नोंदीनुसार, शहरातून चार दुचाकी चोरीला गेल्या आहेत. त्यात शिवराज विवेकानंद कोरे (रा. कुंभारी, ता. दक्षिण सोलापूर) यांची दुचाकी (एमएच १३, डीव्ही १३६४) चोरट्याने शिवाजी चौक परिसरातील राजेश्वरी कृषी केंद्रासमोरून चोरून नेली. कोरे यांनी फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दिली. दुसरीकडे, राजू नरसिंग सिरशिला (रा. गीतानगर, यल्लम्मा मंदिरासमोर, साईबाबा चौक) यांची दुचाकी (एमएच १३, एजी ७३४०) चोरट्याने अक्कलकोट रोडवरील शनी मंदिराजवळून चोरल्याची फिर्याद जेलरोड पोलिसांत दाखल झाली आहे. माळप्पा नरसप्पा सोनकडे (रा. होटगी, ता. दक्षिण सोलापूर) यांची दुचाकी (एमएच १३, बीटी ३८१७) सिद्धेश्वर कारखान्याच्या गेटसमोरून चोरीला गेल्याचा गुन्हा एमआयडीसी पोलिसांत दाखल झाला. तर काशिनाथ शिवपुत्र मधुगुणकी (रा. धोत्रेकर वस्ती, भवानी पेठ) यांची दुचाकी (एमएच १३, डीजे ७२४५) घराजवळून चोरीला गेली आहे. जोडभावी पेठ पोलिस चोरट्यांचा तपास करीत आहेत. विशेष बाब म्हणजे, या दुचाकी चोरीसाठी ‘मास्टर की’चाच वापर झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

दंड देऊ नका, पण दुचाकीसाठी लॉक घ्या!

सिग्नल जम्प केला किंवा अन्य वाहतूक नियम मोडला तर संबंधित दुचाकीस्वाराकडून दंड घेऊ नका. त्यांना चारशे-पाचशे रुपयांचे यू-पिन लॉक विकत घ्यायला लावा, अशा सूचना पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी वाहतूक पोलिसांना दिल्या आहेत. आयुष्याच्या कमाईतून खरेदी केलेली त्यांची दुचाकी चोरीला जाऊ नये, हा त्यामागील हेतू आहे. एकदा सांगूनही पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करीत वाहतूक नियम मोडल्यास दुचाकी जप्त केली जाणार आहे.

दुचाकीस्वारांनी लावावे स्वतंत्र लॉक

शहरातील दुचाकी चोरींचे काही सीसीटीव्ही फुटेज पाहिले. त्यावेळी असे लक्षात आले, की ‘मास्टर की’ वापरून दुचाकींची चोरी केली जात आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांनी कोणत्याही ठिकाणी दुचाकी उभी करताना यू-पिन लॉक लावल्यास दुचाकी चोरी होणार नाही.

– डॉ. राजेंद्र माने, पोलिस आयुक्त, सोलापूर शहर 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here