जीवन समाधानी व आनंदी होण्यासाठी प्रत्येकाने किमान एका कलेत पारंगत व्हावे : गौरव गाडे

0

सातारा/अनिल वीर : बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक अशा आपल्या देशाला विविध कलांचा समृद्ध वारसा लाभला आहे. मानवी जीवनात चित्र, संगीत, साहित्य आदी कलांना अढळ स्थान आहे. कलेशिवाय मानवी जीवन निरर्थक आहे. कलेविना जीवन जगणारा माणूस पशूसमान आहे. संगीतातील वेगवेगळे राग आणि मानवी आयुष्याचे तरंग समान आहेत. विविध कलाव्यवहारामुळे मानवी जीवनाला पूर्णत्व प्राप्त होते. म्हणून  प्रत्येकाने कला अवगत करावी,  असे प्रतिपादन गौरव गाडे यांनी केले.   

                काकासाहेब चव्हाण कॉलेज, तळमावले येथील सांस्कृतिक विभाग व वाङ्मय मंडळ विभागाचे उद्घाटन समारंभानिमित्त प्रमुख अतिथी म्हणून  साहित्य, कला आणि आपले जीवन या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गौरव गाडे बोलत होते.अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. उषादेवी साळुंखे  होत्या.  

        गौरव गाडे म्हणाले, साहित्य वाचनाने आपले जीवन अनुभव समृद्ध होते.  मानवी जीवनाचे प्रतिबिंब साहित्यात पडलेले असते. पाश्चिमात्य साहित्य व्यक्तिकेंद्रित आहे. भारतीय साहित्य विश्वव्यापी आहे. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात अनेक प्रतिभावंतांनी साहित्य समृद्ध केले आहे.

कोणतीही कला सातत्यपूर्ण अभ्यास, सततचा सराव व रियाज यातून आत्मसात करता येते. नाटक हे महाराष्ट्रीय माणसाचे वेड आहे. असे  म्हटले जायचे. नाटकाचा रंगमंच वा आयुष्याचा रंगमंच स्त्रीशिवाय उदासवाणा व  अधुरा  वाटतो. छांदोग्य उषनिषदात स्त्रीचे महत्व विशद केले.

 प्रा. डॉ. यु. ई. साळुंखे  म्हणाल्या, महाविद्यालयात राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे  सहभागी  व्हावे. विद्यार्थ्यांच्या अंगच्या सर्वच कलागुणांना वाव देणारे शिवाजी विद्यापीठाचे युवा महोत्सवाचे व्यासपीठ आहे.त्याचाही आपण लाभ घ्यावा. असे आवाहनही त्यांनी केले.                  

सदरच्या कार्यक्रमास प्राचार्य डॉ. अरुण गाडे,सौ. गाथा  वाघमारे, प्रशांत वाघमारे, महाविद्यालयातील  गुरुदेव कार्यकर्ते, विद्यार्थी-विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या. 

 प्रा. महेश चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय गवराम पोटे यांनी करून दिला.प्रा. सौ. बी. एस. सालवाडगी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डॉ. मनोज सादळे यांनी आभारप्रदर्शन केले.

फोटो : मार्गदर्शन करताना गौरव गाडे शेजारी डॉ.उषादेवी साळुंखे व डॉ.अरुण गाडे(छाया-अनिल वीर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here