प्रताप सरनाईकांना दणका, ईडीने जप्त केलेली संपत्ती परत मिळणार नाही

0

एकनाथ शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांची मार्च 2022 मध्ये सक्तवसुली संचलनालयाकडून 11.4 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली होती. या निर्णयाविरोधात प्रताप सरनाईकांनी अपील न्यायाधिकरणाकडे धाव घेतली होती.

पण संपत्तीच्या जप्तीचा निर्णय योग्यच असल्याचे न्यायाधिकरणाने सांगितले आहे, ही माहिती ईडीच्या सूत्रांनी बीबीसी मराठीला दिली.

ईडीची कारवाई सुरू झाल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी सर्वप्रथम उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडून भाजपसोबत जाण्याची विनंती केली होती.

पुढे झालेल्या घटनाक्रमात एकनाथ शिंदेंनी बंड केले आणि प्रताप सरनाईक हे शिंदेंसोबत गेले. ते शिंदेंसोबत गेल्यानंतर त्यांच्यावरील ईडीची कारवाई कशी थांबली असा प्रश्न उद्धव ठाकरेंच्या गटाकडील नेते सातत्याने विचारत होते.

या पार्श्वभूमीवर प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीची कारवाई झाली आहे.

ईडीने 11.4 कोटींची संपत्ती जप्त करण्याचा निर्णय दिला होता, तो योग्य आहे असे निर्वाळा न्यायाधिकरणाने दिला आहे.

मार्चमध्ये ईडीने त्यांचे ठाण्यातील दोन फ्लॅट आणि मीरा रोडमधील जमिनीचे जप्त केले होते. या कारवाईविरोधात सरनाईक यांनी न्यायाधिकरणाकडे दाद मागितली होती.

मात्र, ईडीची जप्तीची कारवाई योग्य असल्याचा निर्णय देण्यात आला आहे. त्यानंतर आता जप्त केलेली संपत्ती ईडीच्याच ताब्यात राहणार आहे.

2016 मध्ये दाखल करण्यात आलेल्या तक्रारीआधारे आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई पोलिसांनी एनएसईएल प्रकरणात त्याचे संचालक आणि एनएसईएलचे प्रमुख अधिकारी एनएसईएलचे 25 जण आणि इतरांवर मनी लाँड्रिंग तपास सुरू केला होता.

आरोपींनी गुंतवणुकदारांची फसवणूक करण्याचा गुन्हेगारी कट रचला, त्यांना नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेड (NSEL) च्या प्लॅटफॉर्मवर व्यापार करण्यास प्रवृत्त केले आणि बोगस वेअरहाऊस पावत्यांसारखी बनावट कागदपत्रे तयार केली, बनावट खाती तयार केली, असे आरोप या प्रकरणात करण्यात आले आहेत.

आस्था ग्रुपने 21.74 कोटी रूपये विहंग आस्था हाऊसिंगमध्ये ट्रान्सफर केले होते. यातील 11.35 कोटी रूपये विंहग एंटरप्रायझेस आणि विहंग इम्फ्रा या कंपन्यांना देण्यात आले होते असं ईडीचं म्हणणं आहे. या दोन्ही कंपन्या प्रताप सरनाईक यांच्या नियंत्रणात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here