भारत जोडो’ यात्रेने देशात नव चैतन्य – आ.बाळासाहेब थोरात

0

संगमनेर (प्रतिनिधी) : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेचे महाराष्ट्रात साधारणतः ६ नोव्हेंबरला आगमन होणार असून या यात्रेचा राज्यातील प्रवास नांदेड जिल्ह्यातील देलगूर तालुक्यातून होणार असल्याची माहिती राज्याचे माजी मंत्री तथा कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते आ.बाळासाहेब थोरात यांनी दिली.
           संगमनेर  येथे माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा राज्याचे माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरात म्हणाले की, ७ सप्टेंबर रोजी सुरु झालेली ‘भारत जोडो’ पदयात्रा केरळ, तामिळनाडू असा प्रवास करत आता कर्नाटक मध्ये आहे. या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. यात्रेत सहभागी होणाऱ्या नागरिकांची संख्या पन्नास हजारांपासून दीड ते दोन लाखांपर्यंत आहे. या यात्रेमुळे संपूर्ण देशात नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून जगाच्या इतिहासात आजपर्यंत तीन हजार पाचशे साठ किलोमीटरची पदयात्रा कोणीही काढलेली नाही. या भारत जोडो पदयात्रेचे राज्यात ६ नोव्हेंबर पासून आगमन होत असून नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, बुलढाणा असा ३८१ किलोमीटरचा हा प्रवास असून २०१४ पासून देशात ज्या पद्धतीची राजवट सुरु आहे. त्यामुळे लोकशाही, स्वायत्त संस्था धोक्यात आलेल्या आहेत. याशिवाय राज्यघटना,मुलभूत तत्व,आपल्या मतांचा अधिकार हे पुढच्या काळात राहील का ? अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. विकासाची कामे ठप्प झालेली आहेत. बिघडलेली अर्थव्यवस्था,महागाई,प्रचंड बेरोजगारी या महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष देण्याचे सोडून अन्य गोष्टींकडे जास्त लक्ष दिले जात आहे. माणसा माणसांत,समाजात भेद निर्माण करायचा, त्यातून मते मिळवून सत्तेवर राहण्याचा हा प्रयोग चालला आहे. अशी  टीका करत या सर्व गोष्टींच्या विरुद्ध देशाला एकजूट करण्यासाठी काँग्रेसची ही यात्रा असल्याचे माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here