मोरबी पूल दुर्घटना ; १४१ जणांचा मृत्यू

0

मोरबी: गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात नदीवरील झुलता पूल कोसळून आतापर्यंत १४१ जणांचा मृत्यू झाला आहे. गुजरातच्या मोरबी शहरात माच्छू नदीवर बनलेला झुलता पूल कोसळला. या दुर्घटनेत आतापर्यंत १४१लोकांचा मृत्यू झाला आहे. दुरुस्तीसाठी सहा महिने बंद असलेला हा पूल २८ ऑक्टोबरलाच पुन्हा खुला झाला होता. सणाच्या सुट्या आणि रविवार यांमुळे पुलावर प्रचंड गर्दी होती.
एनडीआरएफ, एसडीआरएफच्या तुकड्या बचावकार्यात गुंतल्या आहेत.
गुजरातचे गृहमंत्री हर्ष सांघवी यांनी म्हटलं, “या दुर्घटनेत आतापर्यंत १४१ जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी (३० ऑक्टोबर) संध्याकाळी ६.३० वाजता ही दुर्घटना घडली. ६.४५ पर्यंत बचावकार्याला सुरूवात झाली होती.” त्यांनी पुढे सांगितलं, “मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल तातडीने मोरबी येथे पोहचले आणि त्यांनी इतर व्यवस्था पाहिली. काही तासातच विविध दलाच्या २०० हून अधिक लोकांनी रात्रभर रेस्क्यू ऑपरेशन केले. मुख्यमंत्री कार्यालय आणि मुख्य सचिव कार्यालयाकडून रात्रभर रेस्क्यू ऑपरेशनवर नजर ठेवण्यात आली.”

बचावकार्यात येत आहेत ‘या’ अडचणी
एनडीआरएफचे अधिकारी प्रसन्न कुमार यांनी सांगितलं की, बचावकार्य करताना पथकांना आव्हानांचा सामना करावा लागत आहे. ते म्हणाले, “इथे पाणी साचलं आहे आणि हे पाणी सांडपाणी आहे. त्यामुळे या पाण्यात शोध घेणं खूप कठीण आहे. आमचे कर्मचारी रात्री लाईट घेऊन पाण्यात उतरले पण तरीही काही दिसू शकलं नाही. आमच्यासाठी हे एक मोठं आव्हान आहे. आता सकाळच्या वेळेत परिस्थिती बरी असेल अशी अपेक्षा आहे.” ते पुढे सांगतात, आमच्या पाच टीम इथे तैनात आहेत. यात १२५ बचावकर्मचारी आहेत. तसंच जहाजांमधून खोल पाण्यात उतरण्यासाठी आमच्याकडे गोताखोर सुद्धा उपलब्ध आहेत. आवश्यक उपकरणं आहेत.”

राजकोटचे जिल्हाध्यक्ष अरुण महेश बाबू यांनी सांगितलं की, “घटनास्थळी एसडीआरएफच्या दोन टीम्स, एनडीआरएफची एक टीम आणि बडोद्याहून आलेली एक टीम आहे. सोबत लष्कर, हवाई दल आणि आपत्कालीन विभाग आणि स्थानिक पथकं तैनात आहेत.”

‘मी दोरीने 15 मृतदेह बाहेर काढले’
दुर्घटनेनंतर जवळपास राहत असलेले अनेक लोक मदतीसाठी सरसावले. रमेशभाई जिलरिया तिथेच जवळ होते. पूल कोसळला तिथे जवळच ते राहतात. ते म्हणाले, “मी इथे जवळच राहतो. संध्याकाळी सहा वाजता दुर्घटना घडली. मी लगेच दोरी घेऊन इथे पोहचलो. दोरीच्या सहाय्याने मी जवळपास 15 मृतदेह बाहेर काढले.”

या घटनेनंतरची स्थिती सांगताना ते म्हणाले, “मी आलो तेव्हा ५० ते ६० लोक तुटलेल्या पुलावर लटकत होते. आम्ही या लोकांना वर काढलं. त्यानंतर आम्हाला जसे मृतदेह मिळाले आम्ही ते बाहेर काढले. मृतदेहांमध्ये तीन लहान मुलं होती.”

या दुर्घटनेचे साक्षीदार सुभाषभाई सांगतात, “काम संपवून मी आणि माझा मित्र पुलाजवळ बसलो होतो. पूल कोसळल्याचा मोठ्ठा आवाज आला. आम्ही इथे पोहचलो आणि मदत करण्यास सुरुवात केली.”

“काही लोक पोहत बाहेर येत होते. तर काही जण बुडत हते. आम्ही सर्वातआधी लहान मुलांना बाहेर काढायला सुरुवात केली. पाईपच्या मदतीने आम्ही मोठ्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. ८ ते ९ जणांना आम्ही बाहेर काढलं आणि दोन मृतदेह बाहेर काढले.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here