राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष पदाच्या शर्यतीत अमृता कोळपकर यांचे नाव आघाडीवर

0

संगमनेर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा महिला संघटनेत फेरबदलाचे वारे वाहू लागले असून राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष पदाच्या शर्यतीत संगमनेरच्या सौ.अमृता अनिल कोळपकर यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जाते. सध्या सौ.अमृता कोळपकर या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वक्ता सेलच्या राज्य सरचिटणीस म्हणून काम पाहत आहेत.

          अमृता कोळपकर या मूळच्या संगमनेर तालुक्यातील साकुर येथील रहिवासी असून पक्ष स्थापने पासून त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात. सौ. कोळपकर  यांनी यापूर्वी साकुर पठार भागाचे अध्यक्ष, संगमनेर महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष,  राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस, राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद त्यांनी भूषवले असून सध्या त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वक्ता सेलच्या राज्य सरचिटणीस म्हणून काम पाहत आहेत. गत जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी साकुर जिल्हा परिषद गटातून या भागातील प्रस्थापिता विरोधात निवडणूक लढवली होती. मात्र त्यात त्यांना यश आले नसले तरी त्यांनी पक्ष बांधणीसाठी मोठे कष्ट सुरू ठेवले आहेत. त्यांचे संघटन कौशल्य आणि वकृत्व हे राष्ट्रवादी महिला काँग्रेसला फायदेशीर ठरू शकते. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा पदाच्या निवडीच्या हालचाली सुरू आहेत. लवकरच जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी जिल्ह्यात महिला राष्ट्रवादी काँग्रेस भक्कम होण्याच्या दृष्टीने खांदेपालट करण्याचे नियोजन केले आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याने सध्या हे पद रिक्त आहे. त्यामुळे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांची तात्काळ नियुक्ती करा असा आदेश प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जिल्हा दौऱ्यावर असताना जिल्ह्यातील नेत्यांना दिला होता. त्यामुळे दिवाळीपूर्वी ही नियुक्ती होण्याची शक्यता पक्षातील सूत्रांनी वर्तवली आहे. कुठलाही राजकीय वारसा सौ.अमृता कोळपकर यांच्या पाठीशी नसला तरी त्यांचा पक्ष संघटनेत काम करण्याचा अनुभव त्यांना या पदापर्यंत नक्कीच पोहोचवू शकेल असे मत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सदस्य नोंदणीची मोहीम सुरू आहे. त्यानंतर पक्षाच्या सर्व सेलची पुनर्रचना केली जाणार आहे. राष्ट्रवादीचे जिल्ह्यात मोठे संघटन आहे. त्यामुळे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here