राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल सागर कुलगुंडे यांचा श्री विशाल गणेश देवस्थानच्यावतीने सत्कार अहमदनगर : अहमदनगर डाक विभागातील आनंदी बाजार पोस्ट ऑफिसमध्ये डाक सहाय्यक म्हणून कार्यरत असणारे सागर गोरख कलगुंडे यांची नुकतीच मुंबई येथे संपन्न झालेले डाक विभागाच्यावतीने आयोजित पॉवर लिफ्टिंग, वेटलिफ्टिंग बॉडी बिल्डर स्पर्धा 2023-24 राज्य निवड स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर निवड झाल्याबद्दल श्री विशाल गणेश देवस्थानच्यावतीने सचिव अशोकराव कानडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पुजारी संगमनाथ महाराज, शहर बँकेचे संचालक सुजित बेडेकर, माजी नगरसेवक अर्जुनराव बोरुडे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी अशोकराव कानडे म्हणाले, सागर कलगुंडे यांनी आपली नोकरी सांभाळून आपला छंद जोपासत आहे. पॉवर लिफ्टींग, वेटलिफ्टिंग सारख्या खेळात आपल्या नैपुन्याने चमकदार कामगिरी करत आहेत. त्याची नुकतीच राष्ट्रीय स्पर्धेसाठी झालेली निवड ही पोस्ट खात्याबरोबरच आम्हा सर्वांसाठी अभिमानास्पद बाब आहे. पुढील राष्ट्रीय स्पर्धेतही ते आपल्या कार्यकर्तुत्वाने नक्कीच यश मिळवतील व नगरचे नाव राष्ट्रीय पातळीवर चमकवतील, असा विश्वास आहे. त्यांच्या या कार्यात श्री विशाल गणेशाचे आशिर्वाद पाठीशी राहतील, असे सांगून शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी सुजित बेडेकर, अर्जुनराव बोरुडे यांनी श्री.सागर कलगुंडे यांच्या यशाचे कौतुक करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
सत्कारास उत्तर देतांना सागर कुलगुंडे म्हणाले, सर्वांच्या सदिच्छा आणि सरावाच्या जोरावर आपणास हे यश मिळाले आहे. आज श्री विशाल गणेशाच्या साक्षीने सत्कार केल्याने पुढील स्पर्धेसाठी आशिर्वाद मिळाले आहेत. आपण नक्कीच यशस्वी होऊ असे सांगून सर्वांचे आभार मानले.
राज्याभरातील सुमारे 48 स्पर्धक यात सहभागी झाले होते. त्यात अहमदनगर विभागातून सागर कुलगुंडे यांची निवड झाली आहे. लवकरच राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन होणार आहे. त्यामध्ये सागर कुलगुंडे हे महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार आहे.