Virat Kohli Viral Post: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि सध्या सुरु असलेल्या इंडियन प्रिमिअर लीगच्या 18 व्या पर्वामध्ये सर्वाधिक धावा करुन ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या विराट कोहलीच्या नावाने एक स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. या स्क्रीनशॉटवरील मजकुरानुसार विराट कोहलीने सरकारवर देशातील वाढत्या बलात्काराच्या घटनांवरुन टीका केल्याचा दावा करण्यात आला आहे. सोशल मीडियावर हा स्क्रीनशॉट व्हायरल झाला असून त्याची जोरदार चर्चा सुरु आहे. असं असतानाच आता या स्क्रीनशॉटमागील सत्य समोर आलं आहे.
काय आहे स्क्रीनशॉटमध्ये?
विराट कोहलीच्या नावाने व्हायरल होत असलेल्या या स्क्रीनशॉटमध्ये विराटने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एका पोस्ट केल्याचा दावा करण्यात आला आहे. “एवढं लक्ष सरकावर दिलं असतं तर आज देश बलात्काराची राजधानी झाला नसता,” असं वाक्य या स्क्रीनशॉटमध्ये लिहिलेलं असून ही पोस्ट विराटने इन्स्टाग्राम स्टोरीवर केल्याचा दावा केला जातोय.
सोशल मीडियावरुन हा स्क्रीनशॉट व्हायरल केला जात आहे. तुम्हीच पाहा हा स्क्रीनशॉट…
सत्य काय?
फॅक्ट चेक म्हणजेच व्हायरल पोस्टमागील सत्यता तपासून पाहणाऱ्या ‘बूम’ या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, विराटच्या नावाने व्हायरल होणारा हा इन्स्टाग्राम स्टोरीचा स्क्रीनशॉट फेक म्हणजेच खोटा आहे. विराटने अशी कोणतीही पोस्ट त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर केल्याचं आढून आलेलं नाही. तसेच विराटने असं काही पोस्ट केल्याची बातमीही कुठे दिसून येत नसल्याचं ‘बूम’ने म्हटलं आहे. विराटच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन अशी पोस्ट करण्यात आलेलं नाही. विराटने सरकारवर बलात्काराच्या वाढत्या प्रकरणांवरुन टीका केल्याचं वृत्त कुठेही नाही.
विराटच्या या कथित स्क्रीनशॉटचा फोटो पोस्ट करणाऱ्या @mohitlaws नावाच्या खात्यावरूनही या स्क्रीनशॉटबद्दल खुलासा करण्यात आला आहे. एका युझरने हा स्क्रीनशॉट खरा आहे का? अशी विचारणा केली असता या व्यक्तीने, “नाही, हे मिम आहे, खोटं आहे पण फॅक्ट आहे,” असा रिप्लाय केलेला.
व्हायरल स्क्रीनशॉटवर @indians नावाच्या इन्स्टाग्राम हॅण्डलाचा लोगो दिसत आहे. या पेजवरुन खोटे स्क्रीनशॉट पोस्ट करण्यात आले आहे. “भारतामध्ये आपल्या आयुष्यावर थेट परिणाम करणाऱ्या विषयांवर इतक्याच तीव्रतेने आणि ऊर्जेने बोललं गेलं असतं तर?” अशा अर्थाची कॅप्शन देत हे फेक स्क्रीनशॉट पोस्ट करण्यात आलेत.
एकूण सहा पोस्ट?
विराटच्या नावाने एकूण सहा स्क्रीनशॉट पोस्ट करण्यात आले आहेत. ‘एवढं लक्ष सरकारने दिलं असतं तर…’ अशा सिरीजमध्ये या पोस्ट करण्यात आल्या आहेत.
अंतिम निर्णय : व्हायरल स्क्रीनशॉट फेक
त्यामुळे फॅक्ट चेकमध्ये विराटने खरोखर त्याच्या खात्यावरुन सरकारवर बलात्काराच्या मुद्द्यावरुन टीका करणारे कोणतीही पोस्ट केली नसल्याचं स्पष्ट होत असून व्हायरल स्क्रीनशॉट फेक असल्याचं स्पष्ट होतंय.