Suspicion on Parbhani Tehsil Office regarding illegal minor mineral transportation | गौण खनिज वाहतुकीच्या संशयाची सुई परभणी तहसील कार्यालयाकडे: हायवाची पावती आणि ईटीपी नंबर वरील क्रमांकांचे वाहन वेगवेगळे – Hingoli News

0



वसमत येथील मदिना चौक भागातील हायवा मालकाने सादर केलेल्या माती वाहतुकीच्या पावत्यांमध्ये खाडाखोड आढळून आली असून इटीपी नंबर वरील वाहनाचा क्रमांक व प्रत्यक्षात पावतीवरील क्रमांक वेगवेगळा आढळून आला आहे. सदर पावती परभणीच्या तहसील कार्यालयाकडून देण्यात आल्

.

वसमत येथील मदिना चौक भागात एका हायवा चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात २ जण ठार तर चौघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या हायवा वाहनामध्ये असलेली माती परभणी जिल्ह्यातून वसमत येथील काैठा रोड भागातील वीटभट्टीसाठी नेली जात असल्याचे स्पष्ट झाले होते.

दरम्यान, सदर वाहनातून माती वाहतुकीच्या परवान्याची पावती सादर करण्याच्या सूचना उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार शारदा दळवी यांच्या पथकाने वाहन मालकास दिल्या होत्या. त्यावरून वाहन मालकाने माती वाहतुकीची पावती तहसील कार्यालयाकडे सादर केली.

दरम्यान या पावतीची खात्री करून घेण्यासाठी पथकाने पावती वरील ईटीपी क्रमांक २३५७२१३८ याची पडताळणी केली. मुळ पावतीवर माती वाहतुक परभणी तालुक्यातील देवठाणा गट क्रमांक ११२ मधील एक एकर क्षेत्रातून ५०० ब्रास साठी परवानगी देण्यात आल्याचे दिसून आले. सदर पावतीवर तहसील कार्यालयाची स्वाक्षरी आहे. मात्र पावतीच्या दिनांकावर खाडाखोड केल्याचे दिसून आले असून ता. ३ मे २०२५ सकाळी ११.२५ ते ता. ३ मे दुपारी ३.२५ या कालावधीसाठी पावती वैध असल्याचे दिसून आले. यासाठी पावतीवर वाहनाचा क्रमांक एमएच-२० सीटी-९७९७ नमुद करण्यात आला आहे. यामध्ये चालकाचे नांव इरफान तर परवानाधारकांचे नांव दीपक असल्याचे नमुद आहे.

मात्र पावती वरील खाडाखोड लक्षात घेता प्रशासनाने व्हेइकल मॉनिटरिंगची ऑनलाईन तपासणी केली असता सदर ईटीपी क्रमांक २३५७२१३८ हा ता. २१ एप्रील रोजी सकाळी १० वाजून ११ मिनिटांनी असल्याचे दिसून आले. वाहनाच्या माहितीमध्ये एमएच-१७-सीव्ही-६७७७ या वाहनासाठी पावती दिल्या गेली असून त्यात मालकाचे नांव प्रविण घुगे असल्याचेही स्पष्ट झाले.

ईटीपी क्रमांकावरील दोन्ही माहिती वेगवेगळी असल्यामुळे आता गौण खनिज वाहतुकीच्या संशयाची सुई परभणी तहसील कार्यालयाकडे दिसू लागली आहे. यामध्ये बनावट पावत्या दाखवून तसेच पावत्यांमध्ये खाडाखोड करून बिनदिक्कतपणे माती वाहतूक केली जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता परभणी तहसील कार्यालयाकडून चौकशी होणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here