वसमत शहरामध्ये तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाने अवैधरित्या गॅस भरणा करणाऱ्या ठिकाणावर शुक्रवारी छापा टाकून नऊ गॅस सिलेंडर व गॅस भरण्याची मशीन जप्त केली आहे.
.
वसमत शहरामध्ये मागील काही दिवसांमध्ये पासून अवैध गॅस भरणा केंद्राचा सुळसुळाट झाला आहे. घरगुती वापराचे तसेच व्यावसायिक वापराचे गॅस सिलेंडर घेऊन एका मशीनच्या सहाय्याने इतर गॅस सिलेंडर मध्ये गॅस भरला जात आहे. या गॅस सिलेंडरचा वापर वाहनांमध्ये केला जात आहे. या अवैध व्यवसायामुळे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एखाद्या वेळी एका सिलेंडर मधून दुसऱ्या सिलेंडर मध्ये गॅस भरताना निष्काळजीपणा झाल्यास मोठी दुर्घटना देखील घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. वसमत शहरात काही ठिकाणी अशा प्रकारचे गॅस भरणा केंद्रच सुरू झाले होते.
या संदर्भातील माहिती मिळताच तहसीलदार शारदा दळवी यांनी तातडीने अवैध गॅस भरणा केंद्रावर छापा टाकण्याच्या सूचना तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाला दिल्या होत्या. त्यापूर्वी त्यांनी अशा प्रकारच्या केंद्राची माहिती घेतली होती.
त्यावरून आज वसमतच्या तहसीलदार शारदा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार पांडुरंग हांडे, पुरवठा निरीक्षक बालाजी बोखारे यांच्य पथकाने एका ठिकाणी छापा टाकून आठ घरगुती गॅस सिलेंडर तसेच एक व्यावसायीक गॅस सिलेंडर असे ९ सिलेंडर जप्त करण्यात आले. या सोबत एक वजन काटा, गॅस भरण्यासाठी गॅस रिफ्लिंगच्या तीन मशीन एक ऑटो असा एकूण १ लाख ८३ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये गॅस भरणा केंद्रावर एक ऑटो मध्ये गॅस भरत असताना रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी पुढील कारवाई केली जात असल्याचे तहसील प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले. पुरवठा विभागाच्या या कारवाईमुळे अवैधरित्या वाहनांमध्ये गॅस भरणा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.